Andrew Symonds Emotional tribute: टाऊन्सविले (क्वीन्सलँड) येथे रविवारी ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्स याला अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली. या सामन्यादरम्यान, दिवंगत क्रिकेटर सायमंड्सचे संपूर्ण कुटुंब म्हणजेच त्याची पत्नी, मुले बिली आणि क्लो तसेच त्यांचे पाळीव श्वान यांचाही समावेश होता.
अँड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू झाल्याने साऱ्यांनाच धक्का बसला होता. त्यानंतर रविवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्याच्या स्मृतींना विशेष पद्धतीने आदरांजली वाहण्यात आली.
सायमंड्स दोन वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. १४ मे रोजी त्याचा अपघाती मृत्यू झाला. तो ४६ वर्षांचा होता.
दिग्गज क्रिकेटपटू सायमंड्सला श्रद्धांजली वाहण्यासाठी सायमंड्सची मुले तर आलीच. पण त्यासोबतच सायमंड्सचे दोन लाडके कुत्रे बझ आणि वुडी हे देखील सामन्यादरम्यान उपस्थित होते. सामन्याच्या हाफ टाइममध्ये त्यांनी क्रिकेट पिचवर बॅगी ग्रीन कॅप, क्रिकेट बॅट ठेवून सायमंड्सला आदरांजली वाहिली.
सायमंड्सची दोन्ही लहान मुले वडिलांना श्रद्धांजली वाहताना दिसले. सामन्या दरम्यानच्या ब्रेकमध्ये दोन्ही मुलांनी खेळाडूंना पाणी देत वॉटरबॉयची भूमिका समाधानाने बजावली.
ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनीही यावेळी सर्व संघासोबत क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहिली. सायमंड्सचे क्रिकेटमधील योगदान, विशेषत: क्वीन्सलँडसाठीचे योगदान नेहमीच स्मरणात राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.