मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू हरभजन सिंगने संघातील खेळाडूंवर संताप व्यक्त केला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सला अद्याप ३ सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. दोन दिवसांपूर्वी घरच्या मैदानावर MI चा दारूण पराभव झाला.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर, हार्दिक डगआउटमध्ये एकटाच बसलेला दिसला. हे चित्र पाहून भज्जी प्रचंड संतापला आहे. तो म्हणाला की, ''हार्दिकला एकटे पाडले आहे. संघासभोवतालची परिस्थिती आणि कर्णधारपदाचा निर्णय चांगला दिसत नाही.''
“संघातील चित्र चांगले दिसत नाही. त्याला डग आऊटमध्ये एकटे सोडण्यात आले आहे. फ्रँचायझीच्या खेळाडूंनी त्याला कर्णधार म्हणून स्वीकारले पाहिजे. त्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय झाला आहे आणि संघाने एकत्र राहिले पाहिजे. या फ्रँचायझीसाठी मी खेळलो आहे आणि सध्या परिस्थिती चांगली दिसत नाही,” असे हरभजनने सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर सांगितले.
अंबाती रायडूनेही त्या कार्यक्रमात आपले मत मांडले. त्याने विचारले की टीम सदस्य हार्दिकला 'गोंधळून टाकत आहेत' आणि 'मोकळेपणाने काम करू देत नाही'. हरभजन म्हणाला की, 'ड्रेसिंग रूममधील मोठ्या व्यक्ती हार्दिकला कर्णधार म्हणून मोकळेपणाने काम करू देत नाहीत.''
“मला माहित नाही की हे जाणूनबुजून करत आहे की अनावधानाने, पण संघात बरेच लोक आहेत जे त्याला गोंधळात टाकत आहेत. ड्रेसिंग रूममधील मोठे खेळाडू त्याला कर्णधार म्हणून मोकळेपणाने काम करू देत नाहीत, ही कोणत्याही कर्णधारासाठी चांगली परिस्थिती नाही,” असे भज्जी पुढे म्हणाला.