धोनीसाठी BCCIला मोडावा लागला होता 'हा' नियम, नंतर MSDने पाकिस्तान धू धू धुतलं..

धोनी हा टीम इंडियाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जातो

Happy Birthday MS Dhoni, BCCI Rules: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस. आज तो 42 वर्षांचा झाला. धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने तीनही आयसीसी विजेतेपदे जिंकली. धोनीने आपल्या खेळाने जगभरातील करोडो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले. म्हणूनच निवृत्तीनंतरही तो चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे.

धोनी झारखंडचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होता आणि वयाच्या 23 व्या वर्षी त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली. या यष्टिरक्षक फलंदाजाने ही संधी सोडली नाही आणि मैदानावर दमदार कामगिरी करून दाखवली. करियरच्या सुरूवातीच्या टप्प्यातच पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात तर त्याने गोलंदाजांना धु धु धूतलं.

धोनीने 5व्या वन डे सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 148 धावा केल्या. तर 5व्या कसोटीतही 148 धावांची शानदार खेळी केली. पण या धोनीला संघात घेण्यासाठी बीसीसीआयने त्यांचाच एक नियम बाजूला ठेवला होता. माहीसाठी बीसीसीआयने नक्की कोणता नियम मोडला होता, जाणून घेऊया...

महेंद्रसिंग धोनीचा वयाच्या २१ व्या वर्षी बीसीसीआयच्या TRDW (Talent Resource Development Wing) योजनेत समावेश करण्यात आला होता. या मागे एक अतिशय रंजक कथा आहे. वास्तविक, बंगालचा माजी कर्णधार प्रकाश पोद्दार यांच्या सांगण्यावरून धोनीचा TRDW मध्ये समावेश करण्यात आला. पोद्दार यांच्या सांगण्यावरून वेंगसरकर यांनी ठरवले की, नियमावली गुणवान खेळाडूंच्या आड येता कामा नये.

पोद्दार हे जमशेदपूरला अंडर-19 चा सामना पाहण्यासाठी गेले होते. त्याचवेळी बिहारचा संघ शेजारील केनन स्टेडियमवर एकदिवसीय सामना खेळत होता आणि चेंडू वारंवार स्टेडियमच्या बाहेर पडत होता. यानंतर पोद्दार यांनी उत्सुकतेपोटी ती बाब पाहिली तेव्हा त्यांना कळले की तो धोनी आहे.

वेंगसरकर म्हणाले की, वयाच्या २१ व्या वर्षी पोद्दार यांच्या सांगण्यावरून धोनीला TRDW कार्यक्रमाचा भाग बनवण्यात आले होते. त्यांनी सांगितले की TRDWमध्ये १९ वर्षाखालील मुलांनाच संधी मिळत होती. पण एखाद्या खेळाडूच्या गुणवत्तेपुढे नियमांची आडकाठी होऊ नये या भावनेतून नियमाला बगल देत २१ वर्षांच्या धोनीला या कार्यक्रमात समाविष्ट करून घेण्यात आले.