भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज म्हणून नावारुपाला आलेला मोहम्मद सिराज याचा आज २७ वा वाढदिवस आहे.
मोहम्मद सिराज अतिशय गरीब घराचं प्रतिनिधीत्व करतो. त्याचे वडील ऑटोरिक्षा चालवायचे. आर्थिक चणचण असतानाही सिराजनं अखंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर टीम इंडियाचं दार ठोठावलं.
मोहम्मद सिराजनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २०१७ साली टी-२० क्रिकेटमधून केली. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानं सिराजला नवी ओळख मिळवून दिली.
ऑस्ट्रेलाया दौरा सुरू होण्याआधी सिराजच्या वडीलांचं निधन झालं. पण सिराजनं भारतीय संघासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि तो मायदेशी परतला नाही. संपूर्ण दौऱ्यात सिराज वडिलांच्या आठवणीनं व्याकूळ झाल्याचं सर्वांनी पाहिलं. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना सुरू होण्याआधी राष्ट्रगीतावेळी सिराजच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
भारतीय संघातील स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानं मोहम्मद सिराजला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली.
सिडनी कसोटीवेळी मोहम्मद सिराजला स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर सामना मध्येच थांबविण्यात आला होता. पण सिराजनं याचा परिणाम आपल्या कामगिरीवर होऊ दिला नाही.
भारताच्या युवा संघानं ब्रिस्बेन कसोटीत कमाल करत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आणि मालिका खिशात घातली. भारतीय संघाच्या विजयात मोहम्मद सिराज याचा सिंहाचा वाटा होता. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करणाऱ्या भारताच्या युवा संघाचं जोरदार कौतुक त्यावेळी करण्यात आलं.
ऑस्ट्रेलियातील मालिका जिंकून माघारी परतल्यानंतर मोहम्मद सिराज भारतात दाखल होताच सर्वात आधी कब्रस्तानमध्ये आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचला. त्यानंतर तो घरी रवाना झाला.