ज्या खेळपट्टीवर भारताने २६ षटकांत ११७ धावा काढल्या, त्याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने अवघ्या ६६ चेंडूंत बिनबाद १२१ धावा काढत १० गड्यांनी दणदणीत विजय मिळवला.
या दमदार विजयासह कांगारूंनी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी चेन्नई येथे रंगेल. भारताने एकदिवसीय सामन्यांत सहाव्यांदा १० गड्यांनी पराभव पत्करला.
शुक्रवारी मुंबईत झालेला पहिला एकदिवसीय सामना प्रतिकूल परिस्थितीतून पुनरागमन करत जिंकल्याने भारताकडून दुसऱ्या सामन्यात शानदार कामगिरीची अपेक्षा होती.
मात्र, पुन्हा एकदा फलंदाजांनी नांगी टाकल्याने भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने पुन्हा आग ओकणारा मारा करत ५३ धावांत ५ बळी घेत भारताचा डाव ११७ धावांत गुंडाळला.
क्रिकेटमध्ये खराब फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला कल्पना आहे की, त्याला आता चांगली कामगिरी करावी लागेल. संघ व्यवस्थापनही त्याला संधी देत राहील, असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात सूर्या पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. गेल्या १६ एकदिवसीय सामन्यात त्याला अर्धशतकही झळकावता आलेले नाही.
रोहितने रविवारी सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला की, 'आम्हाला श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाविषयी कल्पना नाही. त्याचे स्थान रिक्त असल्याचे आम्ही सूर्यालाच खेळवणार.
सूर्यकुमारने मर्यादित षटकांच्या सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे आणि मी अनेकदा सांगितले आहे की, त्याच्यामध्ये मोठी क्षमता असून त्याला संधी मिळत राहणार.
रोहित पुढे म्हणाला की, 'सूर्यालाही माहीत आहे की, त्याला आता चमकदार खेळ करावाच लागेल. गेल्या दोन सामन्यांत तो झटपट बाद झाला, पण त्याला ७-८ सामन्यांमध्ये सलग संधी द्यावी लागेल. यामुळे तो सहजपणे खेळेल.