आयपीएल २०२३ च्या प्लेऑफचे चित्र रविवारी स्पष्ट झाले. गतविजेत्या गुजरात टायटन्सने सर्वप्रथम प्लेऑफमध्ये स्थान मिळवले, त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्जने देखील आपली जागा पक्की केली. लखनौ सुपर जायंट्सने केकेआरचा पराभव करून १७ गुणांसह प्लेऑफसाठी दावा ठोकला.
काल रविवारी आयपीएलच्या साखळी फेरीतील दोन अंतिम सामने पार पडले. दोन्हीही सामने प्लेऑफचे चित्र स्पष्ट करणारे होते. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या.
दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. 'करा किंवा मरा'च्या सामन्यात आरसीबीला पराभव पत्करावा लागला. याशिवाय स्पर्धेतून बाहेर देखील व्हावे लागले. गुजरातच्या विजयामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा मुंबई इंडियन्स हा चौथा संघ ठरला.
आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट आल्याचे दिसते. आताच्या घडीला (७३०) धावांसह ऑरेंज कॅप आरसीबीचा कर्णधार फाफ डूप्लेसिसच्या डोक्यावर आहे, तर (६८०) धावांसह शुबमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे.
डूप्लेसिस आणि गिल यांच्यातील धावांचे अंतर केवळ (५०) एवढे आहे. खरं तर शुबमन गिलला अजून किमान दोन सामने खेळायचे आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅप जिंकण्याची सुवर्णसंधी गिलला असणार आहे.
गुजरात टायटन्सचा आगामी सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत मंगळवारी होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ फायनलसाठी पात्र ठरेल, तर पराभूत संघ लखनौ आणि मुंबई यांच्यातील विजयी संघासोबत खेळेल.
लक्षणीय बाब म्हणजे चेन्नई आणि गुजरात या संघांना आणखी किमान दोन सामने खेळायचे आहेत, त्यामुळे गुजरातचा सलामीवीर गिल ऑरेंज कॅप पटकावणार का हे पाहण्याजोगे असेल.
पर्पल कॅपच्या यादीत गुजरातच्याच शिलेदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मोहम्मद शमी आणि राशिद खान प्रत्येकी २४-२४ बळींसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सचा पियुष चावला (२१) बळींसह चौथ्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपरजायंट्स हा सामना बुधवारी होणार आहे. यातील विजयी संघ गुजरात आणि चेन्नई यांच्यातील पराभूत संघासोबत खेळेल, तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.