Sourav Ganguly's firm message to Rahane, Pujara : अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे भारताचे दोन प्रमुख कसोटी फलंदाज आहेत, परंतु मागील काही कालावधीपासून त्यांचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्यांना शेवटची संधी दिली गेली होती अन् त्यातही ते फार काही चांगली कामगिरी करू शकले नाही. त्यामुळे आता या दोघांचं पुढे काय?, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या दोघांच्या कारकिर्दीचा हा दी एंड आहे असे अनेकांना वाटते, तर काहींनी अजूनही आशा सोडलेली नाही. अशात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानं या दोघांच्या बाबतीत एक सूचक इशारा दिला आहे.
Sportstar ला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीनं पुजारा व रहाणे यांच्या फॉर्माबाबत मत व्यक्त केले. या दोघांनी आता रणजी करंडक स्पर्धेत खेळून धावा करायला हव्यात, असे मत गांगुलीने व्यक्त केले. यामुळे आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत या दोघांना संघात स्थान नसेल, हे स्पष्ट होत आहे. २००५ मध्ये गांगुलीनेही रणजी करंडक स्पर्धेत खेळाडू फॉर्म मिळवला होता. त्यानंतर त्यानं भारतीय संघात दमदार पुनरागमन केले होते. त्यामुळे गांगुलीनं आता रहाणे व पुजारा यांनाही तोच सल्ला दिला.
गांगुली म्हणाला,''ही दोघं खूप चांगले खेळाडू आहेत. रणजी करंडक स्पर्धेत ही दोघं खेळून खोऱ्यानं धावा करतील, अशी मला खात्री आहे. इतकी वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्यानंतर पुन्हा स्थानिक स्पर्धेत खेळण्यात काहीच समस्या नाही. तशी मला तरी जाणवत नाही. रणजी करंडक स्पर्धा ही मोठीच स्पर्धा आहे आणि आम्ही सर्व या स्पर्धेत खेळलो आहोत. त्यामुळे या दोघांनीही जावं आणि दमदार कामगिरी करावी. त्यांनी आधीही रणजी करंडक स्पर्धा खेळली आहे. ''
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पुजारानं ६ डावांत १२४ धावा केल्या आहेत, तर रहाणेला ६ डावांत १३६ धावा करता आल्या आहेत. या मालिकेत पुजारानं तीन सामन्यांत ६, १६, ३, ५३, ४३, ९ अशा, तर रहाणेनं ४८, २०, ०, ५८, ९ व १ अशा धावा केल्या आहेत. रहाणेनं २०२० मध्ये अखेरचं शतक झळकावलं होते, तर पुजारानं २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियविरुद्धच १९३ धावांची खेळी केली होती. रहाणेन २०२० व २०२१ मध्ये अनुक्रमे ३८.८५ व १९.५७च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.
पुजाराची मागील १२ महिन्यांतील कामगिरी पाहिल्यास त्यानं १५ सामन्यांत २५.२९च्या सरासरीनं ६८३ धावा केल्या आहेत आणि त्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. रहाणेनं १४ सामन्यांत २०.८४च्या सरासरीनं ५२१ धावा केल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त मयांक अग्रवाल यालाही काही खास करता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्यानं ६ डावांमध्ये २२.५०च्या सरासरीनं १३५ धावा केल्या आहेत.
रणजी करंडक स्पर्धेला १६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ५ मार्चपर्यंत पहिला टप्पा खेळवण्यात येईल आणि दुसरा टप्पा जूनमध्ये होईल.