Gautam Gambhir: "तुझी 50 किंवा 100 शतके छान आहेत, पण विसरू नको की...", गौतम गंभीरने विराटला दिला सल्ला

gautam gambhir on virat kohli: भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने विराट कोहलीच्या खेळीचे कौतुक करताना एक सल्ला दिला आहे.

सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. यजमान संघाने मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात रोहित सेनेने 4 गडी आणि 40 चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिका खिशात घातली.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 216 धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग टीम इंडियाने 43.2 षटकांत 6 बाद 219 धावा करून पूर्ण केला.

लोकेश राहुलने केलेल्या नाबाद 64 धावांच्या खेळीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. भारताने पहिला सामना 67 धावांनी जिंकला होता. त्यामुळे रोहित सेनेने आपल्या नववर्षातील अभियानाची सुरूवात विजयाने केली.

श्रीलंकेविरूद्धच्या सलामीच्या सामन्यात विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील 73वे शतक झळकावले. त्याच्या वन डे कारकिर्दीतील हे 45 वे शतक ठरले. किंग कोहलीने केवळ 87 चेंडूत 113 धावांची खेळी करून भारताची धावसंख्या 371 पर्यंत पोहचवली होती.

खरं तर किंग कोहलीने बांगलादेशविरूद्धच्या अखेरच्या वन डे सामन्यात 113 धावांची शतकी खेळी केली होती. मात्र, मालिकेतील सलामीचे 2 सामने गमावल्यामुळे भारताला मालिका गमवावी लागली होती.

बांगलादेशविरूद्धच्या अखेरच्या वन डे सामन्यात ईशान किशनने द्विशतक तर किंग कोहलीने शतक झळकावले होते. मात्र, बांगलादेशच्या धरतीवर बलाढ्य भारताला 2-1 ने मालिका गमवावी लागली होती.

यावरूनच बोलताना भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने विराट कोहलीसह संघाला एक सल्ला दिला आहे. गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सच्या एक्सपर्ट पॅनेलमध्ये बोलताना म्हटले, "वैयक्तिक खेळीऐवजी सामूहिक कामगिरीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे."

"सगळ्यांनी हे विसरू नये की भारताने बांगलादेशविरुद्धची शेवटची वन डे मालिका गमावली होती. त्याचा आम्हाला विसर पडला आहे. होय, वैयक्तिक प्रतिभा महत्वाची आहे, वैयक्तिक शतके महत्वाचे आहेत."

"जेव्हा तुमचा विक्रम चांगला होतो तेव्हा खूप छान वाटते की तुम्ही तुमचे 50 किंवा 100 शतके पूर्ण केली. परंतु, बांगलादेशात जे घडले ते तुम्ही कधीही विसरू नये. कारण तो खूप मोठा धडा आहे," असे गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला.

तसेच भारताची पूर्ण ताकद बांगलादेशकडून बांगलादेशमध्ये हरली, मला वाटते की आपण फक्त या मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा तिथून पुढे जावे. भूतकाळात जे घडले ते विसरता कामा नये, असे माजी सलामीवीर गंभीरने अधिक म्हटले.

विराट कोहलीने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले. पण, त्याला दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. गुरुवारी कोहली 4 धावांवर बाद झाला त्याला लाहिरू कुमाराने माघारी पाठवले. भारतीय संघ रविवारी मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या वन डेसाठी मैदानात उतरणार आहे.