भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका ३-० ने गमावली. भारताचे दोन बडे खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी चाहत्यांची घोर निराशा केली. तीन कसोटींच्या सहा डावांमध्ये रोहितने केवळ ९१ तर विराटने केवळ ९३ धावा केल्या.
विराटच्या फॉर्मबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींगने एक आकडेवारी सांगितली. गेल्या ५ वर्षात विराटने केवळ २ कसोटी शतके झळकावली आहेत. विराटच्या जागी दुसरा कुणी असता तर त्याला संघात ठेवले गेले नसते असेही तो म्हणाला.
याशिवाय रोहित शर्माने या संपूर्ण वर्षभरात ११ सामन्यात केवळ ५८८ धावा केल्या आहेत. त्यात केवळ २ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. रिकी पॉन्टींगच्या या दाव्यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने प्रतिक्रिया दिली.
गंभीर म्हणाला, 'रिकी पॉन्टींगला भारतीय क्रिकेटशी काय घेणं देणं आहे? मला असं वाटतं की विराट किंवा रोहितबद्दल बडबड करण्यापेक्षा त्याने त्याच्या ऑस्ट्रेलियन संघाकडे लक्ष द्यावं. विराट आणि रोहित दोघेही अतिशय प्रतिभासंपन्न क्रिकेटपटू आहेत.'
'भारतीय क्रिकेटसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली अनेक वर्षांपासून चांगली कामगिरी करत आहेत. भविष्यातही ते दमदार खेळ करतील याची आम्हाला खात्री आहे कारण दोघेही अनुभवी असले तरी नियमित सराव करत असतात.'
'दोघांना खेळाची आवड असून नवे विक्रम करण्याची इच्छा आहे. सतत चांगला खेळ करण्याची भूक असणे ही ड्रेसिंग रूममधील जमेची बाब आहेत. गेल्या कसोटी मालिकेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर खेळाडू दमदार पुनरागमन करण्यास उत्सुक आहेत,' असेही गंभीर म्हणाला.