Join us  

"वर्ल्डकप जिंकून आम्ही कुणावर उपकार केले नाहीत"; गौतम गंभीरचं वादग्रस्त विधान, असं का म्हणाला गौतम?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 7:11 PM

Open in App
1 / 8

२०११ सालच्या वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम सामन्यात सलामीवीर गौतम गंभीरची ९७ धावांची खेळी अतिशय महत्वाची ठरली होती. तब्बल २८ वर्षांनंतर भारतानं वर्ल्डकप उंचावला आणि यात गंभीरचं योगदान मोलाचं ठरलं होतं.

2 / 8

भारताच्या वर्ल्डकप विजयाच्या यशावर आता जास्त विचार करत बसणं योग्य नाही असं रोखठोक मत आता गौतम गंभीरनं व्यक्त केलं आहे.

3 / 8

गंभीरनं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काही थेट विधानं केली आहेत. 'भारतानं वर्ल्डकप जिंकल्याची घटना ही काही कालची घटना नाहीय. त्याला आता १० वर्ष झाली आहेत. सारखं मागे वळून पाहणाऱ्यातला मी नाही. वर्ल्डकप जिंकणं नक्कीच गौरवास्पद गोष्ट होती. पण त्याला आपण कितीवेळ कवटाळून बसणार? आता पुढचा विचार करायला हवा', असं गंभीर म्हणाला.

4 / 8

'२०११ मध्ये आम्ही जे करायला हवं होतं तेच केलं. चांगलं खेळण्यासाठी आमची निवड झाली होती. संघाची जेव्हा निवड होते तेव्हा फक्त स्पर्धा खेळण्याच्या उद्देशाने होत नाही. स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशानं होते. पण आता तशी भावना उरलेली नाही. आम्ही तेव्हा वर्ल्डकप जिंकला ही नक्कीच सामान्य गोष्ट नाही. सर्वच खूप खूश झाले. पण आता पुढच्या वर्ल्डकपवर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आहे', असं मत गंभीरनं व्यक्त केलं.

5 / 8

गौतम गंभीरनं यावेळी सध्याच्या भारतीय संघाबाबतही विधान केलं. 'आपण २०१५ आणि २०१९ सालचा वर्ल्डकप जिंकलो असतो तर नक्कीच आपण क्रिकेट विश्वातील सुपर पावर म्हणून ओळखले गेलो असतो. वर्ल्डकप जिंकून आता १० वर्ष झाली आहेत. त्यानंतर एकही वर्ल्डकप आपण जिंकलेलो नाही. त्यामुळे भूतकाळातील यशाबाबत आता मी उत्सुक नाही', असं गंभीर म्हणाला.

6 / 8

भारतीय संघातील खेळाडूंना गंभीरनं यावेळी अप्रत्यक्षरित्या टोला देखील लगावला. 'वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात मी ९७ धावा केल्या कारण मला धावा करण्यासाठीच निवडलं गेलं होतं. जहीर खानचं काम होतं विकेट्स घेणं. आम्हाला आमचं काम चोख करायचं होतं. २ एप्रिल रोजी जे काही आम्ही केलं ते काही कुणावर उपकार करण्यासाठी केलं नाही', असं रोखठोक विधान गंभीरनं केलं आहे.

7 / 8

संघात जास्त बदल करण्यासही गंभीरनं विरोध दर्शवला. संघात फारसा बदल होऊ न देणं हे फार महत्वाचं असतं. २०११ साली जर संघात अनेक खेळाडूंना पर्याय म्हणून चाचपणी करुन पाहिलं गेलं असतं तर प्रत्येक जागेसाठी तीन ते चार खेळाडू असते. तुम्ही जितके जास्त खेळाडूंना संधी द्याल तितके पर्याय उपलब्ध होतात, असं गंभीर म्हणाला

8 / 8

वर्ल्डकपपूर्वी कमीत कमी सहा महिने किंवा वर्षभरा पूर्वी तुमच्याकडे १५ ते १६ खेळाडू निश्चित झाले पाहिजेत. आम्ही बराच काळ एकत्र क्रिकेट खेळलो आणि हेच यशाचं रहस्य आहे, असंही गंभीरनं म्हटलं.

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयविश्वचषक ट्वेन्टी-२०विराट कोहली