भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अन् दिग्गज सचिन तेंडुलकरने अलीकडेच कुटुंबीयांसह जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला. तेथील फोटो, व्हिडीओ शेअर करून क्रिकेटच्या देवाने काश्मीरचे सौंदर्य चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
सचिनने पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासह जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. येथील एक व्हिडीओ शेअर करत मास्टर ब्लास्टरने चाहत्यांची मनं जिंकली. 'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन' जम्मू आणि काश्मीरमध्ये इंगा हेल्थ रुग्णालयासोबत विकृती असलेल्या बाळांना मदत करत असल्याचे सचिनने सांगितले.
सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, भारतात दरवर्षी सुमारे ६०,००० बालके अशी जन्माला येतात, ज्यांच्या चेहऱ्यावर हसू नसते. किंबहुना त्यांना हे सुख उपभोगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यांच्यासाठी सचिन तेंडुलकर फाऊंडेशन ही संस्था कार्यरत आहे.
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या माध्यमातून, आम्ही डॉक्टरांच्या एका अप्रतिम टीमसोबत काम करत आहोत, जे मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करतात. शस्त्रक्रियांद्वारे लहानग्यांच्या जीवनाला एक नवा आकार देण्याचा प्रयत्न केला जातो.'
तसेच आम्ही ज्या संस्थांना पाठिंबा देत आहोत त्यापैकी एक संस्था श्रीनगरमध्ये आहे. आमच्या जम्मू आणि काश्मीरच्या प्रवासादरम्यान, आम्ही इंगा हेल्थ फाऊंडेशनच्या रुग्णालयात वेळ घालवला, इथे डॉक्टर, मुले आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला.
याशिवाय शस्त्रक्रियेने या मुलांचे जीवन कसे बदलले याच्या कथा ऐकणे खरोखरच समाधानकारक होते. या छोट्या नायकांना भेटल्यावर अंजली, सारा आणि मला हसू अनावर झाले. त्यांच्या आयुष्यातल्या या सुंदर बदलात योगदान दिल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे सुख आहे हा आनंद शब्दांत न सांगता येणारा आहे, असे सचिनने म्हटले.
खरं तर सचिनने जम्मू आणि काश्मीरमधील या सहलीचे वर्णन 'सुंदर अनुभव' असे केले. हा प्रवास कायम स्मरणात राहील असेही त्याने नमूद केले. अलीकडेच सचिनने क्रिकेटची बॅट बनवण्याच्या कारखान्याला भेट दिली होती.
दरम्यान, शिकारा येथे आपल्या कुटुंबासह वेळ घालवणे, रस्त्यावर क्रिकेट खेळणे आणि जम्मू आणि काश्मीरच्या पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार अमीर हुसेनला भेटणे यांसह अनेक आठवणी सचिनने शेअर केल्या.