क्रिकेटच्या जगतात एका षटकात सहा षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांची संख्या मोजकीच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम हा कारनामा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज हर्षल गिब्सने केला होता.
गिब्स त्याच्या स्फोटक खेळीमुळे गोलंदाजांना घाम फोडायचा. पण, आता आफ्रिकन दिग्गज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, त्याचे कारण म्हणजे 'लग्न'. खरं तर गिब्स पुन्हा एकदा आयुष्याची नवीन इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
हर्षल गिब्स वयाच्या ४९व्या वर्षी आयुष्याची नवीन सुरूवात करत आहे. गिब्सची बेस्ट फ्रेंड डाना नेमेथने मागील महिन्यात त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी होकार दिला आहे. या कपलने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
गिब्सने यापूर्वी २००७ मध्ये पहिले लग्न केले होते. टेनिली पोवाईसोबत हर्षल गिब्सचा संसार जास्त काळ टिकला नाही अन् त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर गिब्स अनेक वादात अडकला होता. फिक्सिंगपासून ते मद्यधुंद अवस्थेत फलंदाजीपर्यंत तो चर्चेत होता.
खरं तर गिब्सची होणारी पत्नी डाना नेमेथने काही फोटो शेअर केले आहेत. 'एका महिन्यापूर्वी मी माझ्या जिवलग मित्राशी लग्न करण्यासाठी हो म्हणाले आहे. मी सदैव तुझ्यासोबत असेन', असे तिने म्हटले.
हर्षल गिब्सने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. त्याने अनेक ट्वेंटी-२० लीगमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
पाकिस्तान सुपर लीगमधील कराची किंग्जच्या संघाचा देखील तो प्रशिक्षक राहिला आहे.