भारतीय संघाने टी२० मालिकेपाठोपाठच वनडे मालिकेतही विजयी सुरुवात केली. इंग्लंड विरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने चार गडी आणि ६८ चेंडू राखून सहज विजय मिळवला.
इंग्लंडच्या संघाकडून कर्णधार जॉस बटलरने ५२ तर जेकब बेथेलने ५१ धावा केल्या. जोफ्रा आर्चरनेही शेवटच्या टप्प्यात थोडीशी फटकेबाजी केली. म्हणून इंग्लंड संघाला २४८ धावांपर्यंत मजल मारता आली.
२४९ धावांचा पाठलाग करताना शुभमन गिलने ८७, श्रेयस अय्यरने ५९ तर अक्षर पटेलने ५२ धावा भारताला सहज विजय मिळवून दिला. पण भारताचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला.
सामन्यात रोहित शर्मा अवघ्या २ धावांवर बाद झाला. त्याच्या खराब कामगिरीवरून त्याच्यावर अनेकांनी टीका केली. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यानेही रोहितला खडेबोल सुनावले.
'रोहित शर्मा ज्याप्रकारे बाद झाला, त्यानंतर तो नक्कीच निराश झाला असेल. त्याच्या चेहऱ्यावर दबाव स्पष्टपणे दिसत होता. वन डे क्रिकेटमध्येही तुमच्याकडून मोठी खेळी होत नसेल तर नक्कीच समस्या आहे.'
'मी हे अतिशय ठामपणे सांगतो. खराब फॉर्ममधील एखाद्या बॅट्समनला पुन्हा फॉर्ममध्ये परतायचं असेल, तर वनडे क्रिकेटसारखा सर्वोत्तम दुसरा कुठलाही फॉरमॅट नाही. यात तुम्हाला डाव बांधायला खूप वेळ मिळतो.'
'त्यातही तुम्ही जर टॉप ३ फलंदाजांपैकी एक असाल तर तुम्ही चांगलं खेळलंच पाहिजे. कारण तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात. त्यामुळे इंग्लंविरूद्धच्या मालिकेत किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित फॉर्ममध्ये परतला नाही तर प्रॉब्लेम होईल,' अशी भीती त्याने व्यक्त केली.