आयपीएल २०२३ पूर्वी महेंद्रसिंग धोनी हा शेवटचा हंगाम खेळत असल्याची चर्चा होती. पण, सर्वांचा लाडका माही आगामी आयपीएलमध्ये देखील खेळणार आहे. त्याने एका मुलाखतीदरम्यान यावर शिक्कामोर्तब केला.
२०१९ च्या वन डे विश्वचषकातील भारताचा उपांत्य फेरीचा सामना प्रत्येक भारतीयाच्या मनात आजही ताजा आहे. त्या सामन्याच्या आठवणी म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्नच. तेव्हा धोनी धावबाद झाला अन् न्यूझीलंडने भारताच्या तोंडचा घास पळवला होता.
साहजिकच भारताचा त्या सामन्यात पराभव झाल्याने विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. याबद्दल बोलताना माजी खेळाडू संजय बांगर यांनी एक मोठा दावा केला होता. 'न्यूझीलंडविरूद्धच्या पराभवानंतर माही रडला होता', असे त्यांनी म्हटले होते.
धोनीला एका कार्यक्रमात २०२३चा विश्वविजेता भारतीय संघ बनेल का याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना त्याने म्हटले, 'भावना समजून घ्या, विद्यमान भारतीय संघ चांगला आहे. संघातील सर्वच खेळाडू अप्रतिम कामगिरी करत आहेत. याहून अधिक मी काही बोलू शकत नाही. समजणाऱ्याला इशारा पुरेसा असतो.'
तसेच लोकांनी मला एक चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवावं हिच माझी इच्छा असल्याचेही धोनीने यावेळी नमूद केले. धोनीने आयपीएल २०२४ मध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले.
'मी केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, आयपीएलमधून नाही. इथे चेन्नई सुपर किंग्जचे देखील चाहते आहेत. गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि विश्रांती घेत आहे. डॉक्टरांनी सांगितले होते की, नोव्हेंबरपर्यंत बरे वाटेल. पण मला रोजच्या कामात कोणतीही अडचण येत नाही', असेही धोनीने सांगितले.
धोनी पुढे म्हणाला की, परिस्थितीनुसार निवृत्तीची घोषणा करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. धन्यवाद म्हणणे आणि निवृत्त होणे हेच माझ्यासाठी योग्य होते. पण सीएसकेच्या चाहत्यांकडून मला खूप प्रेम मिळाले आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी आणखी एक हंगाम खेळणार आहे, ही एक माझ्याकडून भेट असेल.
२०१९ च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड आणि भारत आमनेसामने होते. संजय बांगर यांनी म्हटल्याप्रमाणे धोनी या पराभवानंतर रडला होता का? असे माहीला विचारले असता त्याने म्हटले, 'जेव्हा तुम्ही महत्त्वाचा सामना गमावता तेव्हा तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे थोडे कठीण होते. मी प्रत्येक सामन्यासाठी माझा प्लॅन तयार ठेवतो आणि माझ्यासाठी हा मी भारतासाठी खेळलेला शेवटचा सामना होता.'
२०१९ च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करून फायनलचे तिकिट मिळवले होते. पण, अंतिम सामन्यात इंग्लंडने किवी संघाला पराभूत करून विश्वचषक उंचावला.