गांगुलीची 'दादागिरी'! लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्टलेस होण्यापलिकडची गोष्ट

एक नजर सौरव गांगुलीनं सेट केलेल्या खास रेकॉर्ड्सवर...

बंगालचा प्रिन्स अन् क्रिकेट जगतातील 'दादा' या नावाने लोकप्रिय असलेला टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

भारतीय क्रिकेट संघाची बांधणी करण्यात सौरव गांगुलीचा मोठा वाटा राहिला आहे. टीम इंडियाचे नेतृत्व केल्यावर त्याने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या स्वरुपात प्रशासकीय जबाबदारीही बजावली आहे.

सौरव गांगुली म्हटलं की, अनेकांना क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्ड्सच्या बाल्कनीतील त्यानं शर्टलेस होऊन केलेली 'दादागिरी' आठवते. पण तुम्हाला माहितीये का? या पलिकडेही गांगुलीच्या नावे काही असे रेकॉर्ड आहेत, जे अजूनही अबाधित आहेत. एक नजर त्या खास रेकॉर्ड्सवर...

वनडे क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीनं सचिन तेंडुलकर साथीनं डावाी सुरुवात करताना १७६ सामन्यात जवळपास ४८ च्या सरासरीसह ८२२७ धावा केल्या आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. अन्य कोणत्याही जोडीनं वनडेत सलामीच्या रुपात एवढ्या धावा केलेल्या नाहीत.

मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही सौरव गांगुलीनं खास छाप सोडली आहे. २००० च्या हंगामात या स्पर्धेच्या फायनलमध्ये त्याने ११७ धावांची खेळी केली होती. त्याची ही खेळी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमधील आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च खेळी आहे.

कसोटी कारकिर्दीत सौरव गांगुलीनं २३९ धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. कसोटीत कोणत्याही डावखुऱ्या फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

१९९९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सौरव गांगुलीनं १८३ धावांची खेळी केली होती. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

१९९७ मध्ये सौरव गांगुलीनं वनडेत सलग चार वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकवला होता. हा एक वर्ल्ड रेकॉर्डच आहे.