फॅफ ड्यू प्लेसिस आता पुन्हा CSK च्या पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या ( CSA) नव्या लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सने ( CSK) जोहान्सबर्ग फ्रँचायझीचे मालकी हक्क जिंकले आहेत आणि त्यांनी जोहान्सबर्ग सुपर किंग्स असे फ्रँचायझीचे नाव केले आहे. CSK च्या या फ्रँचायझीमधून फॅफ ड्यू प्लेसिस पुन्हा CSK कुटुंबात दाखल होणार आहे.
Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार फॅफ ड्यू प्लेसिस हा CSK फ्रँचायझीचा Marquee ( प्रमुख) खेळाडू असणार आहे. या लीगमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आदी आयपीएल फ्रँचायझींनी अन्य संघ खरेदी केले आहेत. एकूण ६ संघ या लीगमध्ये खेळणार आहेत. प्रमुख खेळांडूच्या कराराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
फॅफ ड्यू प्लेसिसने २०११ ते २०२१ या कालावधीत ( २०१६ व २०१७ हे पर्व वगळता) चेन्नई सुपर किंग्सचे आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. २०२२मध्ये फ्रँचायझीने त्याला रिटेन केले नाही आणि तो RCBच्या ताफ्यात दाखल झाला.
चेन्नई सुपर किंग्सने CSA League मध्ये जोहान्सबर्ग फ्रँचायझीचे मालकी हक्क मिळवले आहेत आणि प्रत्येक फ्रँचायझींनी पाच करारबद्ध केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यास सांगितली आहेत. यामध्ये एक आफ्रिकन व तीन परदेशी खेळाडू असायला हवेत. एकाच देशाचे दोनपेक्षा अधिक खेळाडू असता कामा नयेत आणि एक अनकॅप्ड् खेळाडू हवा.
CSK ने फॅफ ड्यू प्लेसिससह, इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली यालाही करारबद्ध केल्याचे सांगितले जात आहे. मोईन अली हा आयपीएलमध्ये चेन्नईकडूनच खेळतो आणि यूएई लीगमध्येही तो चेन्नईच्याच मालकी हक्क असलेल्या संघाचा सदस्य असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने प्रेटोरिया व सनरायझर्स हैदराबादने पोर्ट एलिझाबेथ संघाचे मालकी हक्क मिळवले आहेत. या दोन्ही संघांनी अनुक्रमे एनरीच नॉर्खिया व एडन मार्कराम यांना प्रमुख खेळाडू म्हणून करारबद्ध केले आहे. राजस्थान रॉयल्सच्या मालकी हक्क असलेल्या पार्ल फ्रँचायझीने जोस बटलरला करारबद्ध केले आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या डरबन फ्रँचायझीने क्विंटन डी कॉकशी करार केला आहे.
मुंबई इंडियन्सकडे केप टाऊन फ्रँचायझीचे मालकी हक्क जिंकले आहेत आणि त्यांनी कालच फ्रँचायझीचे नाव MI Cape Town असे जाहीर केले. या फ्रँचायझीने राशिद खान, सॅम कुरन, लिएम लिव्हिंगस्टोन व कागिसो रबाडा या स्टार खेळाडूंना करारबद्ध केल्याचे वृत्त आहे.