इंग्लंडच्या या मैदानात विजय मिळवणारा भारत हा आशियातील पहिला संघ अन् शुबमन गिल पहिला कॅप्टन ठरला आहे.
इथं एक नजर टाकुयात भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पाच खेळाडूंच्या खास कामगिरीवर...
इंग्लंडच्या बाल्लेकिल्ल्यातील लढाई जिंकून देण्यात सेनापती अर्थात टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल सर्वात आघाडीवर होता. गिलनं पहिल्या डावातील द्विशतकासह दुसऱ्या डावात शतकी कामगिरी करताना ४३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
रिषभ पंत यानेही दोन्ही डावात मिळून ९० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या डावात त्याने केलेली फटकेबाजी इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडणारी होती.
अष्टपैलू रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात गोलंदाजीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याआधी दोन्ही डावात अर्धशतकी खेळीसह इंग्लंडच्या संघासमोर धावांचा डोंगर उभारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली
गोलंदाजीमध्ये आकाश दीपनं पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत एकूण १० विकेट्स घेत बुमराहची कमी भरून काढली.
मोहम्मद सिराजनेही पहिल्या डावातील ६ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या डावात सलामीची जोडी फोडत या सामन्यात त्याने ७ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.
प्रमुख गोलंदाज १७ विकेट्स मिळवून देत असतील, तर कॅप्टनच काम आणखी सोपे होते, अशा शब्दांत मॅचनंतर शुबमन गिलनं सिराज आणि आकाश दीपच्या गोलंदाजीच कौतुक केल्याचेही पाहायला मिळाले.