"गौतम गंभीरला KKR मध्ये आणा", चाहत्यांच्या प्रश्नावर माजी खेळाडूचं 'दिल से' उत्तर

gautam gambhir ipl : ईडन गार्डनवर गौतम गंभीर आणि चाहत्यांच्या 'प्रेमाच्या' नात्याचे दृश्य पाहायला मिळाले.

लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्याच घरात पराभूत करून कृणाल पांड्याच्या नेतृत्वातील संघाने ही किमया साधली.

काल ईडन गार्डनवर गौतम गंभीर आणि चाहत्यांच्या 'प्रेमाच्या' नात्याचे दृश्य पाहायला मिळाले. गंभीरच्या काही चाहत्यांनी 'गौतम गंभीरला पुन्हा कोलकाता नाईट रायड्समध्ये आणा' अशा आशयाचे पोस्टर झळकावले.

गंभीरने देखील आपल्या चाहत्यांचे फोटो पोस्ट करत मनं जिंकणारं कॅप्शन लिहलं आहे. खरं तर गंभीर आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे.

कोलकाताविरूद्धचा सामना जिंकून लखनौच्या नवाबांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत लखनौचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

सामन्यानंतर गंभीरने युवा खेळाडू रिंकू सिंगच्या अप्रतिम खेळीचे कौतुक केले. पुन्हा केकेआरमध्ये येण्याच्या चाहत्यांच्या मागणीवर गंभीरने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "तुम्हाला माहिती आहे, "मी कोलकातावर किती प्रेम करतो."

गौतम गंभीर मोठ्या कालावधीपर्यंत केकेआरच्या संघाचा हिस्सा राहिला आहे. गंभीरच्या नेतृत्वात दोनवेळा केकेआरच्या संघाने आयपीएलचा किताब जिंकला आहे.

काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने केकेआरला १ धावेने नमवून विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने निर्धारित २० षटकांत १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरचा संघ ७ गडी गमावून १७५ धावा करू शकला.

रिंकू सिंगने ३३ चेंडूत ६७ धावांची नाबाद खेळी करून चाहत्यांना जागे केले पण त्याची खेळी व्यर्थ ठरली. केकेआरला अखेरच्या २ चेंडूमध्ये विजयासाठी १२ धावांची आवश्यकता होती. रिंकूने एक षटकार आणि चौकार ठोकून कडवी झुंज दिली पण केकेआरला १ धावेने पराभव पत्करावा लागला.

लखनौच्या संघाच्या विजयात गंभीरचा देखील मोठा वाटा आहे. गंभीर अनेकदा ड्रेसिंगरूममधून आपल्या संघाला मार्गदर्शन करताना दिसला आहे.

लखनौचा संघ आपला नियमित कर्णधार लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. आज रविवारी प्लेऑफसाठी चौथा संघ कोण असेल याचे गणित स्पष्ट होणार असून मुंबई इंडियन्स किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एक संघ प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित करेल.