Dinesh Karthik:राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जास्त आराम; दिनेश कार्तिकने केली शास्त्रींची पोलखोल

रवी शास्त्रींपेक्षा राहुल द्रविडच्या प्रशिक्षक पदाच्या काळात आरामशीर वाटत असल्याचे दिनेश कार्तिकने म्हटले.

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या कार्यकाळात भारताने अनेक मालिकांवर कब्जा केला होता. त्यांच्या मार्गदर्शनात संघाने जागतिक स्तरावर आपली एक वेगळीच छाप सोडली होती. मात्र आता संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहुल द्रविडच्या खाद्यांवर आहे. दरम्यान, संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जास्त आराम मिळत असल्याचे कार्तिकने म्हटले आहे.

"संघाचे तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री खेळाडूंना नेहमी प्रेरीत करायचे मात्र ते पराभव पचवू शकत नव्हते", असे कार्तिकने म्हटले. शास्त्री आणि कोहली यांचा कार्यकाळ भारतीय संघासाठी शानदार राहिला होता. मात्र खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या खेळाडूंकडे दुर्लक्ष केले म्हणून त्यांच्यावर टीका देखील झाली होती.

क्रिकबजच्या एका कार्यक्रमात बोलताना कार्तिकने म्हटले, जे फलंदाज ताबडतोब फलंदाजी करत नाहीत अर्थात मोठे फटकार मारत नाहीत असे खेळाडू शास्त्रींच्या नजरेत वाईट व्हायचे. तसेच नेटमध्ये काहीतरी वेगळे आणि लाईव्ह सामन्यात काही वेगळे करणारे खेळाडू शास्त्रींना आवडायचे असे त्याने अधिक म्हटले.

शास्त्रींना नेहमी कल्पना असायची की संघाला काय हवे आहे आणि संघाला कसे प्रदर्शन करायचे आहे. ते अपयश सहन करू शकत नव्हते. त्यांनी नेहमीच सर्वांना चांगले खेळण्याची प्रेरणा दिली. भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली अधिक आरामशीर वाटत आहे, असे कार्तिकने अधिक सांगितले.

आयपीएलमध्ये शानदार खेळी केल्यामुळे कार्तिकचे भारतीय संघातील तिकिट पुन्हा एकदा निश्चित झाले. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेत उल्लेखणीय कामगिरी केल्यामुळे कार्तिकचे संघातील स्थान पक्के झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे आशिया चषकात देखील कार्तिकची खेळी पाहायला मिळणार आहे. आशिया चषक २०२२ चे बिगुल २७ ऑगस्टपासून वाजणार आहे.