CWG 2022:भारतीय महिलांना रौप्यवर मानावे लागले समाधान; 'या' ५ चुकांमुळे हुकले सुवर्ण

हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघाला राष्ट्रकुल स्पर्धेच्या फायनलच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या पंढरीत इतिहास रचून सुवर्ण कामगिरी केली. या पराभवासोबतच भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

ऑस्ट्रेलियाने फायनलच्या सामन्यात भारताचा ९ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने २० षटकात ८ बाद १६१ एवढी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ १५२ धावा बनवू शकला आणि सुवर्ण पदकाला मुकला. कर्णधार हरमनप्रीतने शानदार अर्धशतकी खेळी करून एकतर्फी झुंज दिली मात्र तिला संघाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही. विशेष म्हणजे पहिल्या डावातील तिसऱ्या षटकात रेणुका सिंगने ॲलिसा हिलीचा बळी घेतला होता. पॉवरप्ले नंतर प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या ४३ होती मात्र पुढील ४ षटकात ऑस्ट्रेलियाने ४० धावा काढून भारतावर दबाव टाकला.

हरमनप्रीतने ७ ते १० षटकांमधील ४ षटकांसाठी वेगवेगळ्या ४ गोलंदाजांचा प्रयोग केला. यामुळेच कांगारूच्या संघाला सामन्यात पकड बनवण्यास मदत झाली. ७ व्या षटकात राधा यादवने ३, ८ व्या षटकात स्नेह राणाने ८, ९व्या षटकात पूजा वस्त्राकरने १२ आणि १०व्या षटकात कर्णधार हरमनप्रीतने १७ धावा दिल्या.

१२ व्या षटकात दीप्ती शर्माने ताहिला मॅक्ग्राचा मोठा बळी पटकावला. ताहिला ताबडतोब फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात होती. तरीदेखील दीप्ती शर्माला ४ षटकेच टाकण्याची संधी मिळाली आणि त्याचा कांगारूच्या फलंदाजांनी फायदा घेतला. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या ५ षटकांमध्ये ३६ धावा चोपल्या.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या २२ धावांवर भारताचे सलामीवीर तंबूत परतले. यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवरील दबाव वाढला. स्पर्धेत २ अर्धशतक ठोकणारी मराठमोळी स्मृती मानधना ६ आणि शेफाली वर्मा ११ धावा करून बाद झाली.

हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रोड्रिग्ज या दोघींनी तिसऱ्या बळीसाठी ९६ धावांची मोठी आणि महत्त्वाची भागीदारी नोंदवली. मात्र संघाने शेवटचे ८ खेळाडू केवळ ३४ धावा करून गमावले आणि इथेच कांगारूने सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे भारतीय संघ आव्हानापासून ९ धावा दूर राहिला आणि सुवर्ण पदकाला मुकला. दरम्यान, भारताच्या खात्यात रौप्य पदकांची नोंद झाली असून प्रथमच स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय महिलांनी पदक जिंकून तिरंग्याची शान वाढवली आहे.