आयपीएलच्या इतिहासातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या ख्रिस गेलने एक खळबळजनक खुलासा केला. ख्रिस गेलने सांगितले की आयपीएलमध्ये प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्ज संघाने त्याच्याशी इतकी वाईट वर्तणूक केली की त्याला आयपीएल सोडावे लागले.
२०१८ मध्ये ख्रिस गेल प्रिती झिंटाचा संघ पंजाब किंग्जमध्ये सामील झाला. गेलला पंजाब किंग्जने २ कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर विकत घेतले. हा खेळाडू २०२१ पर्यंत या संघात राहिला पण बायो बबलमुळे तो IPL 2021 मध्यातच सोडून मायदेशी परत गेला.
आता एका मुलाखतीत ख्रिस गेलने त्या संबंधीची सगळी कहाणी सांगितली आहे. तो म्हणाला की, प्रत्यक्षात पंजाब किंग्ज संघात त्याच्यासोबत गैरवर्तन झाले होते, ज्याचा त्याला आजही संताप आहे. तसेच त्याने याविरोधात आवाज न उठवल्याचा त्याला पश्चात्तापही आहे.
गेल म्हणाला की, पंजाबसोबतचा माझा आयपीएल हंगाम स्पर्धेआधीच संपला. खरं सांगायचं तर, पंजाब किंग्जमध्ये माझ्याशी गैरवर्तन झाले. मला वाटते की एक वरिष्ठ खेळाडू म्हणून मला योग्य वागणूक मिळाली नाही. मी लहान मूल असल्यासारखे मला वागवण्यात आले.
एक वेळ अशी आली की, ख्रिस गेल प्रचंड निराश झाला होता, तो नैराश्यात (डिप्रेशन) गेला होता. ख्रिस गेलने मुलाखतीत असेही सांगितले की, पंजाब किंग्जने त्याचा अपमान केला. त्याला एखाद्या वरिष्ठ क्रिकेटपटूसारखी दर्जेदार वर्तणूक देण्यात आली नाही.
गेल पुढे म्हणाला की, मानसिक स्थिती पैशांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. मी अनिल कुंबळेला फोन केला आणि त्यांना सांगितले की मी संघ सोडत आहे. आम्ही एका बायो-बबलमध्ये होतो, ज्यामुळे खूप एकटा पडले. कुंबळेशी बोलताना मी ढसढसा रडलो.
अनिल कुंबळे आणि संघ व्यवस्थापन ज्यापद्धतीने वागत होता, त्यामुळे मी खूप निराश झालो. कर्णधार केएल राहुलने मला फोन केला आणि सांगितले की तू पुढचा सामना खेळणारेस. पण मी त्याला शुभेच्छा दिल्या आणि माझी बॅग पॅक करून निघालो, असे गेल म्हणाला.