"जे प्रेम हैदराबादमध्ये मिळालं ते...", बाबर, शाहीन, रिझवान पाहुणचार पाहून इमोशनल

pakistan world cup squad : वन डे विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाला आहे.

५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार असून यासाठी देशभरातील संघ भारतात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानी संघ देखील हैदराबादमध्ये दाखल झाला आहे.

खरं तर पाकिस्तानी संघ सात वर्षांनंतर भारतात आला आहे. बाबर आझमच्या संघाने प्रथम लाहोर ते दुबई असा प्रवास केला. दुबईहून पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबाद विमानतळावर दाखल झाला.

पाकिस्तानच्या संघाचे हैदराबाद विमानतळावर दणक्यात स्वागत करण्यात आले. बाबर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आपल्या संघासोबत आला आहे. या आधी २०१६ मध्ये पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय संघ भारतीय भूमीत उतरला होता.

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर पाकिस्तानी संघ भारतात दाखल झाला. कारण बाबरच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला व्हिसा मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे त्याच्या संघाला भारतात पोहोचण्यास वेळ लागला. म्हणून दुबईत होणारे पाकिस्तान संघाचे शिबिरही रद्द करण्यात आले.

पाकिस्तानने पहिल्यांदा लाहोर ते दुबई असा प्रवास केला. त्यानंतर ते दुबईहून भारतातील हैदराबाद येथे पोहोचले. जिथे २९ सप्टेंबरला पाकिस्तान संघ २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.

भारतात येताच पाकिस्तानी खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय व्यवस्थापनाचे आभार मानले. बाबर आझमने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून म्हटले की, जे प्रेम हैदराबादमध्ये मिळाले ते पाहून खूप आनंद झाला.

पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने देखील भारतात आल्यावर मिळालेल्या सोयीवरून आभार मानले. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने देखील भारतीयांप्रती प्रेम व्यक्त केले.

पाकिस्तानी संघातील दोन खेळाडूंचा अपवाद वगळता सर्वच खेळाडू प्रथमच भारतीय धरतीवर क्रिकेट खेळणार आहेत.

बाबर आझमचा संघ हैदराबादमध्ये ६ ऑक्टोबरला विश्वचषकातील आपला पहिला सामना नेदरलँड्सविरूद्ध खेळेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी. राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.