भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजीचा पर्याय निवडला. कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताच्या सलामीवीरांनी तो सार्थ ठरवला.
उपकर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल या दोघांनी संयमी आणि शानदार खेळी करत पहिले सत्र बिनबाद खेळून काढले. दुसऱ्या सत्राच्या सुरूवातीला या मयंक अग्रवालने आपले अर्धशतक साजरे केले. त्यानंतर लगेचच संघाचे शतकही पूर्ण झाले.
या सामन्यात केएल राहुलनं जबरदस्त शतक ठोकत भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणलं. दरम्यान, राहुलच्या या खेळीनंतर त्यानं भारतीय संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याचाही एक विशेष विक्रम मोडला. दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर केएल राहुलचं हे पहिलं शतक होतं, तर कसोटी कारकीर्दीतील हे त्याचं सातवं शतक होत.
केएल राहुलनं सुरुवातीपासूनच सांभाळून फलंदाजी केली. तसंच पहिल्या विकेटसाठी त्यानं मयंक अग्रवालसोबत ११७ धावांची शतकी भागीदारी केली. तसंच या भागीदारीनं भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणलं.
मयंक ६० धावा करुन बाद झाला. परंतु आपला उत्तम खेळ सुरू ठेवत केएल राहुलनं २१८ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. त्यानं आपल्या शतकीय खेळीदरम्यान एक षटकार आणि १४ चौकार लगावले.
२०१७-१८ मध्ये केएल राहुलनं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी त्याला उत्तम खेळ करता आला नाही. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला दोन कसोटी सामने खेळायला मिळाले होते.
दोन सामन्यांमध्ये त्याला केवळ १०,४,०,६ इतक्याच धावा करता आल्या होत्या. सेंच्युरिअन कसोटी सामन्यात त्यानं १० आणि ४ धावा केल्या होत्या. परंतु यावेळी त्यानं सामन्याच्या पहिल्याच डावात शतक ठोकलंय.
कसोटी क्रिकेटमध्ये आशियाच्या बाहेर ओपनर म्हणून केएल राहुलचं हे पाचवं शतक आहे. त्यानं भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याचा विक्रम मोडला. यापूर्वी त्यानं कसोटी सामन्यात आशियाच्या बाहेर झालेल्या सामन्यात ४ शतकं ठोकली होती. आशिया बाहेर ओपनर म्हणून सर्वाधिक शतकं सुनील गावस्कर यांच्या नावे आहेत.
सुनिल गावस्कर यांनी ८१ डावांमध्ये १५ शतकं, केएल राहुलनं ३४ डावांमध्ये ५ शतकं, विरेंद्र सेहवागनं ५९ डावांमध्ये ४ शतकं आणि विनू मांकड आणि रवी शास्त्री यांनी १९ डावांमध्ये ३ शतकं ठोकली होती.
बॉक्सिंग डे (२६ डिसेंबरला सुरू होणारा सामना) टेस्टच्या पहिल्या दिवसाच्या खेळात सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत लोकेश राहुलने दुसरा क्रमांक पटकावला. त्याने पहिल्या दिवशी नाबाद १२२ धावा केल्या. यादीत पहिल्या क्रमांकावर विरेंद्र सेहवाग असून त्याने २००३ साली मेलबर्नमध्ये १९५ धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या क्रमांकावरील मोहम्मद अझरूद्दीनने वेलिंग्टनमध्ये १९९८ साली पहिल्या दिवशी नाबाद १०३ धावांची खेळी केली होती.
दक्षिण आफ्रिकेत शतक ठोकणारा केएल राहुल हा भारताचा केवळ दुसरा सलामीवीर ठरला. याआधी २००६-०७च्या आफ्रिका दौऱ्यात वासिम जाफरने शतक ठोकले होते. त्याने ११६ धावांची खेळी केली होती. परंतु, राहुल पहिल्या दिवसअखेर नाबाद १२२ धावांवर खेळत असल्याने आता, आफ्रिकेत भारतीय सलामीवीराचा सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम राहुलच्या नावे झाला आहे.
केएल राहुल हा इंग्लंड, विंडिज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या चारही देशांमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला. आशियाई उपखंडाच्या बाहेर सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.