वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार

BCCI Prize Money: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आणि याचे भव्यदिव्य सेलिब्रेशन देशभरात सुरू आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानेही या पहिल्यावहिल्या आयसीसी महिला वर्ल्ड कप विजयाचा खास गौरव केला आहे.

महिला विश्वचषक २०२५ जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघासाठी बीसीसीआयने आपली तिजोरी उघडली आहे. आयसीसीपेक्षा बीसीसीआयने १२ कोटी रुपयांची अधिक बक्षीस रक्कम भारतीय संघाला देण्याचे जाहीर केले आहे.

भारताने पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धा जिंकली त्यामुळे हा महिला क्रिकेटसाठी एक मोठा क्षण आहे. या ऐतिहासिक विजयाच्या सन्मानार्थ, बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी भरीव बक्षीस रक्कम जाहीर केली. ही प्रचंड मोठी रक्कम आयसीसीकडून विजेत्या संघाला मिळणाऱ्या जवळपास ३९.५५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ही घोषणा करताना सांगितले की, ज्याप्रमाणे १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने क्रिकेटमध्ये एक नवा उत्साह आणला होता, त्याचप्रमाणे हरमनप्रीत आणि तिच्या टीमने केवळ ट्रॉफीच नाही, तर आज प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले आहे.

या विजयाचे महत्त्व ओळखून बीसीसीआयने खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफसाठी ५१ कोटी रुपये रोख पुरस्कार जाहीर केला आहे.पूर्वी बक्षीस रक्कम २.८८ दशलक्ष डॉलर्स होती ती आता १४ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे.

यावेळी देवजीत सैकिया यांनी सांगितले की, खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसह संपूर्ण टीमला सन्मानित करण्यासाठी बीसीसीआयने हा ५१ कोटींचा खजिना उघडला आहे. वेतन समानता लागू करणे असो किंवा बक्षिसाच्या रकमेत थेट ३०० टक्के वाढ करून ती १४ मिलियन डॉलरपर्यंत नेणे असो, या सर्व निर्णयांनी महिला क्रिकेटला नेक्स्ट लेव्हलवर नेले आहे, असे सैकिया यांनी नमूद केले.

फाइनल सामन्यात भारतासाठी दीप्ती शर्मा (५८ धावा) आणि 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेल्या शफाली वर्मा (८७ धावा) यांनी कमाल कामगिरी केली, तर दीप्ती शर्माला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरवण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत वर्ल्ड कप जिंकणाऱ्या या महिला टीमने ऐतिहासिक कामगिरीसह आर्थिक पुरस्काराच्या बाबतीतही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

भारतीय महिला संघाने हा किताब जिंकून २००५ आणि २०१७ च्या विश्वचषकात अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. वनडे आणि टी२० अशा दोन्ही फॉरमॅटमधील हा भारताचा पहिलाच विश्वकिताब ठरला आहे.