पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. बांगलादेशविरोधात झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात त्याला जास्त धावा करता आल्या नसल्या तरी पाकिस्तानकडून (Pakistan) टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्यानं आपल्या नावे केला आहे.
शनिवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात बाबर आझम केवळ एक धाव करून बाद झाला. असं असलं तरी पाकिस्तानकडून टी २० सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे. त्यानं पाकिस्तानकडून खेळताना ६९ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५१५ धावा केल्या आहेत.
बाबर आझमनंतर दुसऱ्या क्रमांकावर मोहम्मद हफीझ आहे. त्यानं ११९ सामन्यांमध्ये २५१४ धावा केल्या. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर शोएब मलिक आहे. त्यानं १२४ सामन्यांमध्ये २४२३ धावा केल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत बाबर आझमनं उत्तम फलंदाजी केली होती. पाकिस्तानचा संघ कोणताही सामना न हरता सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. परंतु सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
बाबर आझमनं टी २० विश्वचषक २०२१ मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यानं सहा सामन्यांमध्ये ६०.६ च्या सरासरीनं ३०३ धावा ठोकल्या. त्यानं टी २० विश्वचषक स्पर्धेदरम्यान चार अर्धशतकंही ठोकली.
नामिबियाविरुद्ध झालेल्या सामन्यात बाबर आझमनं सर्वाधिक ७० धावा केल्या. बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांच्या टी २० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करत पाकिस्ताननं २-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेत ७ विकेट्स गमावून १०७ धावा केल्या होत्या. फखर जमां याच्या ५७ धावांच्या जोरावर पाकिस्ताननं ११ चेंडू राखून बांगलादेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग केला.