Join us  

Ind vs Eng 3rd Test : अक्षर पटेलनं रचला इतिहास; ३२ वर्षांत एकाही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही, ते करून दाखवलं

By स्वदेश घाणेकर | Published: February 24, 2021 7:09 PM

Open in App
1 / 8

Ind vs Eng 3rd Test : स्थानिक खेळाडू अक्षर पटेल ( Axar Patel) आणि आर अश्विन ( R Ashwin) यांच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचे खेळाडू सहज अडकले. अक्षर पटेलनं ३८ धावांत ६ विकेट्स, तर आर अश्विननं २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गडगडला.

2 / 8

नाणेफेकीचा कौल बाजूनं लागताच इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारतीय फिरकीपटूंनी त्याला हा निर्णय का घेतला, असा विचार करण्यास भाग पाडले. खेळपट्टीचा अंदाज घेत कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) लगेच फिरकी गोलंदाजांना पाचारण केलं आणि त्याचा हा डाव यशस्वी ठरला.

3 / 8

शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्मा याचा यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इशांत शर्मानं तिसऱ्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ली ( ०) याला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवलं. ५० हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

4 / 8

आर अश्विननं इंग्लंडचा कर्णधार जो रूटला ( १७) माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. झॅक क्रॅव्ली हा एका बाजूनं खिंड लढवत होता, परंतु पटेलनं त्याला बाद केलं. क्रॅव्लीनं ५३ धावा केल्या. जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ऑली पोप हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर इंग्लंडची अवस्था आणखी बिकट झाली.

5 / 8

भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गुंडाळला. स्टुअर्ट ब्रॉडची विकेट घेत अक्षर पटेलनं या कसोटीतही पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. डे नाईट कसोटीत पाच विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय, तर जगातला सहावा फिरकी गोलंदाज ठरला आहे. डे नाईट कसोटीत इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी ( वि. बांगलादेश, २०१९) पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

6 / 8

कारकिर्दीतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत डावात पाच विकेट्स घेणारा अक्षर पटेल हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी नरेंद्र हिरवाणी (Narendra Hirwani, 1988) आणि महोम्मद निसार ( Mohammad Nissar, 1933) यांनी हा पराक्रम करून दाखवला होता. ३२ वर्षानंतर भारतीय गोलंदाजाकडून असा पराक्रम झाला.

7 / 8

डे नाईट कसोटीतील ही फिरकीपटूची दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. देवेंद्र बिशू ( ८/४९ वि. पाकिस्तान, २०१६-१७) याचा पहिला क्रमांक येतो. पाकिस्तानच्या यासीर शाहनं २०१७-१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध १८४ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

8 / 8

भारतीय फिरकीपटूंनी आजच्या सामन्यात ६४ धावा देत ९ विकेट्स घेतल्या. कसोटीच्या एका डावात भारतीय फिरकीपटूंनी ८ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेत सर्वात कमी धावा देण्याची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघअहमदाबादअक्षर पटेल