साखळी फेरीतील पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाला, नेपाळविरुद्ध पावसाच्या खोड्यानंतर विजय मिळवून सुपर ४ मध्ये प्रवेश केला. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध राखीव सामन्यात झालेल्या लढतीत विजय मिळवला अन् १५ तासांच्या आत आज दुसरी मॅच खेळून तिही जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुपर ४ मध्ये दोन विजयांची नोंद करून ४ गुणांसह अंतिम फेरी गाठली. श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवून पाकिस्तानचा फायनलचा मार्ग मोकळा केला.
भारतीय संघाच्या २१३ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने १७२ धावा केल्या. ५ विकेट्स घेणाऱ्या दुनिथ वेल्लालागेने फलंदाजीतही कमाल दाखवली अन् नाबाद ४२ धावांची खेळी केली. धनंजया डी सिल्वाहसह ( ४१) त्याने सातव्या विकेटसाठी जोडलेल्या ६३ धावा सामन्याला कटालणी देणाऱ्या ठरल्या असत्या. पण, भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून विकेट्स मिळवल्या. कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या. दोन सामन्यांत त्याच्या खात्यात ९ विकेट्स झाल्या आहेत.
श्रीलंकेची सलग १३ सामन्यांची अपराजित मालिका आज भारतामुळे खंडित झाली अन् पाकिस्तानला उभारी मिळाली. श्रीलंकेने ही मॅच जिंकली असती, तर पाकिस्तान स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता बळावली असती, परंतु आता त्यांना एक संधी मिळाली आहे.
१४ तारखेचा त्यांचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे आणि तो जिंकून ते १७ तारखेला भारताला फायलनमध्ये भिडू शकतात. पण, या सामन्यात पावसाने खोडा घातला अन् सामना रद्द झाला, तर श्रीलंका फायनल खेळेल. कारण त्यांचा नेट रन रेट ( ०.२०) अजूनही पाकिस्तानपेक्षा ( -१.८९) चांगला आहे.
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान लढतीत जो जिंकेल तो भारताला १७ तारखेला फायनलमध्ये भिडेल. भारताने फायनलमधील प्रवेश पक्का केल्यामुळे १५ तारखेची बांगलादेशविरुद्धची मॅच केवळ औपचारिकता राहिली आहे.