Asia Cup 2022,India-Pakistan : मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या पराभवानंतर भारतीय चाहत्यांना जल्लोष साजरा करण्याची संधी टीम इंडियाने रविवारी दिली. वर्ल्ड कपनंतर प्रथमच समोर आलेल्या पाकिस्तान संघाचा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पराभव केला. या विजयाचा जल्लोष कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर पर्यंत रात्रभर सुरू होता. आता आणखी दोन वेळा अशी जल्लोषाची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातला हायव्होल्टेज सामना जगभरातील क्रिकेट चाहत्यांना हवा असतो. त्यामुळेच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील India-Pakistan सामन्याची तिकिट काही मिनिटांतच संपली आणि आता काळाबाजार सुरू झाला आहे. आशिया चषक स्पर्धेतही काल स्टेडियम हाऊल फुल होतं आणि आता आणखी दोन वेळा असा नजरा पाहायला मिळू शकतो.
६ दिवसांनंतर म्हणजेच ४ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामना होण्याची दाट शक्यता आहे. India-Pakistan हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत आणि ग्रुप अ मधील अव्वल दोन संघ Super 4 मध्ये एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. अ गटात हाँगकाँग हा तिसरा संघ आहे आणि तो अव्वल दोनमध्ये स्थान पटकावण्याची शक्यता कमीच आहे. अशात भारत व पाकिस्तान हेच टॉपर राहतील.
३१ ऑगस्टला भारत-हाँगकाँग सामना होणार आहे आणि २ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग अशी लढत होईल. हे दोन्ही संघ हाँगकाँगवर मात करतील अशी अपेक्षा आहे आणि असे झाल्यात ४ सप्टेंबरला A1 व A2 म्हणजेच गटातील अव्वल दोन संघ ( India-Pakistan ) यांच्यात लढत होईल.
भारत व पाकिस्तानचा फॉर्म पाहता दोन्ही संघ अंतिम फेरीतही एकमेकांसमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अफगाणिस्तानचे कडवे आव्हान Super 4 मध्ये या दोन्ही संघांसमोर असेल. ११ सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेची फायनल होणार आहे.