५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या दोन गत फायनलिस्टमध्ये सलामीचा सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण १० संघ मैदानावर उतरणार आहेत. श्रीलंका आणि नेदरलँड्स यांनी पात्रता फेरीत अव्वल कामगिरी करून भारताचे तिकीट मिळवले. दोनवेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिज प्रथमच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही.
१० संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत कोणताही ग्रुप पाडलेला नाही. म्हणजेच प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघांना समान ९ सामने खेळावे लागतील आणि त्यानंतर उपांत्य फेरी व अंतिम फेरी होईल. स्पर्धेचा अंतिम सामनाही १९ नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.
साखळी फेरीच्या सामन्यानंतर जे संघ अव्वर चार असतील ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. साखळी फेरीतील अव्वल संघ विरुद्ध चौथा संघ आणि दुसरा संघ विरुद्ध तिसरा संघ असे उपांत्य फेरीचे सामने होतील. त्यानंतर १९ नोव्हेंबरला फायनल होईल.
५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणाऱ्या या महास्पर्धेत एकूण १० मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच ८२ कोटी ९५ लाख ८२,००० रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव केला जाणार आहे. विजेत्या संघाला यापैकी ४ मिलियन म्हणजेच जवळपास ३३.१८ कोटी रुपये दिले जाणार आहेत. उपविजेत्याला २ मिलियन म्हणजेच १६ कोटी दिले जातील. उपांत्य फेरीतील दोन संघांना प्रत्येकी ६ कोटी आणि साखळी फेरीतील संघांना प्रत्येकी ८२ लाख मिळतील.
भारतातील १० शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यात येणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. ठरलेल्या दिवशी सामना थांबवावा लागला, तर तो पुढच्या दिवशी खेळवला जाईल.
२०१९च्या वर्ल्ड कप प्रमाणेच ९ पैकी ७ सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीसाठी सहज पात्र ठरेल. ६ विजयानंतरही संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, परंतु त्याला अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. जर संघांचे गुण समान झाले, तर नेट रन रेटचा विचार केला जाईल आणि त्यानंतर निर्णय होईल.
२०१९मध्ये न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यात चौथ्या स्थानासाठी चुरस झाली होती. दोन्ही संघांनी समान ५ विजयासह ११ गुणांची कमाई केली होती. त्यांच्या एक सामना अनिर्णीत राहिलेला. अशावेळी नेट रन रेट कामी आला होता. ३ संघांनी सहा विजय मिळवल्या, नेट रन रेटवर निकाल लागेल. अशा परिस्थितीत ७ विजय हे सर्वात सुरक्षित गणित आहे.