भारतीय क्रिकेट संघाचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवशी चाहत्यांसह सहकारी खेळाडू त्याला शुभेच्छा देत आहेत.
रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने पतीच्या वाढदिवशी एक खास पोस्ट केली. राधिकाने लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच तिने मुलांसोबतचे त्यांचे काही फोटो देखील शेअर केले.
राधिकाने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, कधीही हार न मानणाऱ्या माझ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... हे प्रेम आणि आनंदाचे आणखी एक वर्ष आहे, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
सामन्यादरम्यान राधिका अनेकदा रहाणेला चीअर करताना प्रेक्षक गॅलरीत दिसली आहे. त्याचे फोटो, व्हिडीओ ती अपलोड करत असते.
अजिंक्य आणि राधिका यांना दोन अपत्य आहेत. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांचे लग्न २६ सप्टेंबर २०१४ मध्ये झाले. दोन वर्षांपूर्वी अजिंक्य आणि राधिका राघव या त्यांच्या मुलाच्या रूपात दुसऱ्यांदा आई-बाबा झाले.
या मराठमोळ्या जोडीला २०१९ मध्ये एक मुलगी झाली. अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची प्रेमकहाणी जुन्या बॉलिवूड चित्रपटांची आठवण करून देणारी आहे.
हे दोघे बालपणीचे मित्र असून एकमेकांवर खूप प्रेम करतात. अजिंक्य आणि राधिका लहानपणापासून शेजारीच राहत होते. मागील काही काळापासून अजिंक्य रहाणे भारतीय संघापासून दूर आहे.
अजिंक्यला क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये अर्थात कसोटी क्रिकेटमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर भारतीय संघातून वगळण्यात आले. मात्र, त्याला रणजी ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघाचा कर्णधार बनवण्यात आले. काही महिन्यांपूर्वी त्याच्या नेतृत्वात मुंबईचा संघ चॅम्पियन झाला.
रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने रणजी करंडक जिंकण्याची किमया साधली. मुंबईकरांनी विदर्भाचा पराभव करून ४२व्यांदा जेतेपद पटकावले.