जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध (IND vs AUS) होणाऱ्या या सामन्यासाठी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघ जाहीर केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला आगामी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. रणजी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीनंतर आयपीएलमध्ये (IPL 2023) स्फोटक खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या कामगिरीची दखल निवड समितीने घेतली असून त्याला संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल आणि लोकेश राहुल असे तीन सलामीवीर संघात असतील. तर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर मधल्या फळीची धुरा असेल.
अजिंक्य रहाणेसोबतच शार्दुल ठाकूरलाही भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षणाची धुरा पुन्हा एकदा के.एस. भरतकडे सोपवण्यात आली आहे.
तर रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल अशा तीन फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल.
दरम्यान, अजिंक्य रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्यास कोणाचा पत्ता कट होईल? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. शांत, सयंमी आणि अनुभवी या रहाणेच्या पैलूंचा भारताला नक्कीचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
खरं तर बीसीसीआयने इंग्लंडमधील खेळपट्टीचा विचार करता रणनिती आखली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारत अतिरिक्त फलंदाज खेळवेल.
भारताच्या डावाची सुरूवात कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल करेल. तर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत आणि लोकेश राहुल यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.
इंग्लंडमध्ये संघाला अतिरिक्त फलंदाजांची गरज भासेल. त्यामुळे रवींद्र जडेजाच्या रूपात एक अष्टपैलू खेळाडू संघात असेल. तर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. विशेष बाब म्हणजे रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, अक्षर पटेल आणि उमेश यादव यांना बाकावर बसवले जाऊ शकते.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.