asia cup 2023 : दारूण पराभवानंतर पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; यजमानांचं 'भविष्य' आता भारताच्या हाती

Asia Cup Final Qualification : भारतीय संघाने सांघिक खेळी करत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.

विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून पाकिस्तानची पळता भुई थोडी केली. भारतीय संघाने सांघिक खेळी करत यजमान पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.

बहुचर्चित सामन्यात कोहली आणि राहुलने विक्रमी भागीदारी केली आणि कोलंबो येथील प्रसिद्ध आर प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध ३५६ धावांचा डोंगर उभारला.

भारताविरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाची अडचण वाढल्याचे दिसते. ३५७ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बाबरच्या पाकिस्तानला ३२ षटकांत ८ बाद केवळ १२८ धावा करता आल्या. हारिस रौफ आणि नसीम शाह दुखापतीमुळे फलंदाजीसाठी येऊ शकले नाहीत.

भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने घातक गोलंदाजी करत यजमानांना घाम फोडला. त्याने २५ धावांत ५ बळी घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

पाकिस्तानविरूद्ध मोठा विजय मिळवत भारतीय संघाने आशिया चषक २०२३ च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे. याशिवाय बांगलादेशचा संघ तळाला आहे.

भारत (+४.५६०), श्रीलंका (+०.४२०) आणि पाकिस्तान (-१.८९२) यांचे प्रत्येकी २-२ गुण आहेत. परंतु नेट रनरेटच्या बाबतीत भारत दोन्ही संघांपेक्षा वरचढ आहे.

भारत आज सुपर ४ च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या श्रीलंकेचा सामना करत आहे. पाकिस्तानी संघाने सुपर ४ मधील आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. बाबर आझमच्या संघाचा शेवटचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. सुपर ४ च्या क्रमवारीत पाकिस्तान श्रीलंकेच्या मागे आहे.

सुपर ४ च्या क्रमवारीनुसार, श्रीलंकेचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी पाकिस्तानला त्यांच्या शेवटच्या सुपर ४ सामन्यात श्रीलंकेचा पराभव करावा लागेल.

भारतीय संघाने आपल्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये (श्रीलंका, बांगलादेश) विजय मिळवल्यास रोहितचा संघ अव्वल स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

श्रीलंकेने सुपर स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तानला पराभूत केल्यास गतविजेते आशिया चषकाच्या फायनलमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतात. लक्षणीय बाब म्हणजे बांगलादेशने भारताचा पराभव केल्यास देखील पाकिस्तानी संघाला संधी मिळू शकते.

मंगळवारी जर भारताने श्रीलंकेवर मात केली तर पाकिस्तानला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी शेजाऱ्यांना भारतीय संघावर अवलंबून राहावे लागणार आहे. कारण असे झाल्यास श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना उपांत्य फेरीसारखाच होईल.