भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात धुमाकूळ घातला. त्याने अवघ्या ३९ चेंडूत ७४ धावा केल्या, ज्यात सहा चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. या कामगिरीसह तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ५० षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
अभिषेकने वेस्ट इंडिजचा फलंदाज एविन लुईसचा विक्रम मोडला. लेवीसने ३६६ चेंडूत ५० षटकारांचा पल्ला गाठला होता. लुईसने आतापर्यंत खेळलेल्या ६५ टी२० सामन्यांमध्ये १३६ षटकार मारले आहेत.
वेस्ट इंडिजचा तडाखेबाज अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ४०९ चेंडूत ५० षटकार मारले. रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी ८६ टी-२० सामन्यांमध्ये ९५ षटकार मारले आहेत.
अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह झझाईने ४९२ चेंडूत ५० षटकार मारले. २७ वर्षीय खेळाडूने आतापर्यंत ४५ टी-२० सामन्यांमध्ये ६६ षटकार मारले.
भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने ५१० चेंडूत ५० षटकार मारले. सूर्याने ८७ टी-२० सामन्यांमध्ये १४८ षटकार मारले आहेत.