Sourav Ganguly: बीसीसीआयच्या बैठकीत खूप काही घडले! गांगुली मुख्यालयातून बाहेर पडणारा शेवटचा होता...

वार्षिक बैठकीत सौरव गांगुलीवर बोट दाखविणारे अनेकजण होते. चेहऱ्यावरील निराशा साफ दिसत होती.

सौरव गांगुली हा असा क्रिकेटर आहे, ज्याने टीम इंडियाला आक्रमकपणा काय असतो ते दाखवून दिले होते. परंतू, याच सौरव गांगुलीला ना सन्मानाने निरोप घेता आला ना बीसीसीआयच्या अध्यक्ष पदावरून पायऊतार होताना सन्मान मिळाला. मंगळवाच्या बीसीसीआयच्या बैठकीत गांगुलीविरोधात खूप काही घडले-बिघडले. त्याचा चेहराच सारे काही सांगून जात होता. त्याने तीन वर्षे अध्यक्षपद सांभाळले, परंतू काल ते त्याच्याकडून हिसकावून घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मंगळवारच्या वार्षिक बैठकीत सौरव गांगुलीवर बोट दाखविणारे अनेकजण होते. त्याच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले गेले. बीसीसीआयचा एक मोठा गट गांगुलीवर नाराज होता, या बैठकीत गांगुली एकटा पडला होता. बैठकीत त्याच्या चेहऱ्यावरील निराशा साफ दिसत होती. त्याला अध्यक्षपदी रहायचे होते, परंतू त्याला स्पष्ट नकार देण्यात आला.

मुंबईत काल बीसीसीआयच्या मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीला देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते. अनेकांनी नव्याने नियुक्ती झाली. यावेळी गांगुलीच्या भविष्याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. कोणी म्हणत होते, त्याला कोलकाताला परत पाठविले जाईल, कोणी दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीमध्ये जाईल. चित्र स्पष्ट होते, गांगुली कालच्या दिवशी खूप काही गमावणार होता. याचा अंदाज त्यालाही असेलच.

कार्यकारिणीतील जवळ जवळ सर्वांनाच पुन्हा नव्या कार्यकारिणीत संधी देण्यात आली. पण त्यात सौरव गांगुली आणि संयुक्त सचिव जयेश जॉर्ज नव्हते. सौरव गांगुलीने आपली नाराजी लपविण्याचा प्रयत्नही केला नाही. प्रघातानुसार मावळता अध्यक्ष नव्या अध्यक्षाच्या नावाचा प्रस्ताव ठेवतो, परंतू गांगुलीने रॉजर बिन्नी यांच्या नावाचा प्रस्तावही ठेवला नाही, असे सूत्रांनी एनबीटीला सांगितले.

बीसीसीआयच्या ऑफिसमधील एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर धक्कादायक बाब सांगितली. सौरव गांगुली अस्वस्थ दिसत होता, निराशही होता. नामांकन प्रक्रिया संपल्यानंतर मुख्यालय सोडणारा तो शेवटचा व्यक्ती होता. पटकन गाडीत बसला आणि निघून गेला. त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे त्याला अनौपचारिक बैठकांमध्ये सांगण्यात आले होते. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे गांगुलीच्या विरोधकांपैकी एक होते. बीसीसीआयच्या अधिकृत प्रायोजकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या ब्रँडचे समर्थन केल्याचा गांगुलीवर आरोप करण्यात आला होता. यापूर्वीही हा मुद्दा अनेकदा उचलला गेला होता.