एकदिवसीय विश्वचषक 2023 आता अंतिम टप्प्यात आहे. इथून प्रत्येक सामन्यातील विजय किंवा पराभव कोणत्याही संघाची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता ठरवेल.
अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स संघाने या स्पर्धेत अनेक मोठे अपसेट केले आहेत. त्यांनी महत्वाच्या संघाला पराभूत करत गुणतालिकेचे संपूर्ण गणित बिघडवून टाकले आहे.
टीम इंडिया सध्या या विश्वचषकात 6 पैकी 6 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. असे असूनही टीम इंडियाला अद्याप उपांत्य फेरीत प्रवेश मिळवता आलेला नाही. हे असे का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
विश्वचषकात घडलेल्या प्रकारांमुळे खालच्या क्रमांकावर असलेल्या संघांनी अनेक बलाढ्य संघांची गणिते बिघडवली आहेत. आता प्रत्येक संघ बाद फेरीत आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे.
सहापैकी सहा सामने जिंकूनही भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपले स्थान अद्याप पक्के केलेले नाही. गतविजेता इंग्लंडचे सध्या केवळ २ गुण आहेत आणि अजून तीन सामने खेळायचे आहेत. इंग्लंडची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता फारच कमी आहे.
उपांत्य फेरीसाठी जादुई क्रमांक काय? उपांत्य फेरी गाठण्यासाठी 14 गुणांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर १२ गुणांसह उपांत्य फेरी गाठण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, मात्र त्यासाठी इतर संघांची मदत घ्यावी लागणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ दावेदार आहेत.
अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान आणि अगदी नेदरलँड्सला अजूनही टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. अफगाणिस्तानने त्यांचे उर्वरित तीनही सामने जिंकले आणि 12 गुणांसह साखळी फेरी पूर्ण केली तर त्यांना संधी मिळेल. श्रीलंका आणि पाकिस्ताननेही त्यांचे तीन सामने जिंकले तर 10 गुण पूर्ण करू शकतात आणि नेदरलँड्सही तेच करू शकतात. म्हणजेच उपांत्य फेरीसाठी ही स्पर्धा अजून खुली आहे.