Join us

पराभवाचं दुःख एका बाजूला ठेवा, टीम इंडियाच्या ५ सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 14:48 IST

Open in App
1 / 7

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा, आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा दुष्काळ संपवेल अशी धारणा मनात घट्ट झाली होती. साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयाने चाहत्यांचा आनंद द्विगुणीत झालेला. पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या तगड्या संघांनाही भारताने एकहाती पाणी पाजले. त्यामुळे हा वर्ल्ड कप आपलाच, हे मनात ठाम झाले होते.

2 / 7

फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आल्याने जरा धाकधुक वाढलेली, कारण हा संघ मोठ्या स्पर्धांमध्येच आपले पत्ते खोलतो आणि ते काल सिद्ध झाले. रोहित शर्माने घाई केली, विराट-लोकेश यांनी बरेच चेंडू निर्धाव खेळले, गोलंदाजीत अपयश अशी अनेक कारणं आता चाहते शोधत आहेत. पण, या संपूर्ण स्पर्धेतून बरेच सकारात्मक पैलूही टीम इंडियामध्ये पाहायला मिळाले आहेत.

3 / 7

रोहित शर्मा या संपूर्ण स्पर्धेत बिनधास्त खेळला. त्याचा निर्भीडपणा भारतासाठी खूपच फायद्याचा ठरला. पहिल्या पॉवर प्लेमध्ये रोहितने ताकद दाखवल्यानंतर भारताच्या मधल्या फळीला मुक्तपणे खेळता आले. रोहितने कधीच शतक पूर्ण व्हावे किंवा एखादा रेकॉर्ड व्हावा यादृष्टीने खेळ केला नाही. पहिल्या १० षटकांत भारताने या संपूर्ण स्पर्धेत किमान ७ वेळा ८०+ धावा केल्या. त्यामुळे पुढे लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर यांना मुक्तपणे खेळता आले. रोहितने ११ सामन्यांत ५५च्या सरासरीने ५९७ धावा केल्या.

4 / 7

२०१९च्या वर्ल्ड कपच्या आधीपासून भारतीय संघ चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या शोधात होता. या क्रमांकावर संघ व्यवस्थापनाने अनेक पर्यायांची चाचपणी केली अन् अखेर श्रेयस अय्यरच्या रुपाने त्यांना खेळाडू सापडला. श्रेयसने या वर्ल्ड कपमध्ये ६७च्या सरासरीने ५३० धावा केल्या. उपांत्य फेरीत त्याने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून भारताला मजबूत धावसंख्या उभारून दिली.

5 / 7

हार्दिक पांड्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला नसता तर मोहम्मद शमीचा करिष्मा पाहायला मिळाला नसता, हे सत्य आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली आणि शमीची टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली. शमीनं दोन्ही हातानं ही संधी पकडली अन् खऱ्या अर्थानं सोनं केलं. वर्ल्ड कपमध्ये ७ सामन्यांत त्याने सर्वाधिक २४ विकेट्स घेतल्या.

6 / 7

राहुल द्रविडने वर्ल्ड कप स्पर्धेत लोकेश राहुलकडे दिलेली दुहेरी जबाबदारी यशस्वी ठरली. यष्टिरक्षणाची जबाबदारी खांद्यावर आल्यावर लोकेशच्या फलंदाजीवर परिणाम होईल, अशी शंका व्यक्त केली जात होती. पण, राहुलने यष्टिंमागे चांगली कामगिरी केलीच, शिवाय फलंदाजीत आपले नाणे खणखणीत वाजवले. DRS साठी रोहित पूर्णपणे लोकेशवर अलवंबून होता आणि त्याने कधीच कॅप्टनला चुकीचा सल्ला दिला नाही. लोकेशने यष्टींमागे १७ बळी टीपले आणि भारताकडून वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठऱली.

7 / 7

विराट कोहलीने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी सर्वस्व झोकून खेळ केला. स्पर्धेत ११ सामन्यांत ९५.६२च्या सरासरीने त्याने ७६५ धावा केल्या. वर्ल्ड कपच्या एका पर्वातील या सर्वाधिक धावा आहेत. त्याने या वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक ४९ शतकांचा विक्रमही मोडला.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुल