IPL २०२६ च्या हंगामासाठी अबू धाबीत पार पडलेल्या लिलावात ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील शेरे या छोट्याशा गावातील गरीब शेतकऱ्याच्या मराठमोळ्या मुलावर सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिने लाखमोलाची बोली लावली.
ज्या लिलावात अनेक स्टार क्रिकेटरला अनसोल्डचा टॅग लागला जिथं शेतकऱ्याच्या मुलाला हमी भाव मिळाला. इथं जाणून घेऊयात कोण आहे ओमकार तारमळे?
काव्या मारन हिने ज्या २३ वर्षीय खेळाडूवर ३० लाखांचा डाव खेळला तो ओमकार शहापूरच्या शेरे या छोट्याशा गावातील आहे. टेनिस क्रिकेट ते IPL पर्यंतचा त्याचा प्रवास अगदी प्रेरणादायी असा आहे.
ओमकार तारमळे हा उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज आहे. तो फलंदाजीही उजव्या हातानेच करतो. स्थानिक टेनिस क्रिकेटमध्ये गावासाठी ट्रॉफी जिंकायच्या जिद्दीनं त्याने भागातील अनेक स्पर्धा गाजवल्या.
T20 मुंबई क्रिकेट लीग स्पर्धेत इगल ठाणे स्ट्रायकर्स (Eagle Thane Strikers) संघाकडून खेळताना दिसला होता. या स्पर्धेत त्याने सातत्याने 140 kmph पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करण्याती क्षमता दाखवली. त्याने टाकलेल्या सर्वात वेगवान चेंडू हा 145 kmph इतक्या वेगाचा होता.
या वेगाच्या जोरावरच गरीब कुटुंबियात जन्मलेल्या या वेगवान गोलदाजासाठी जगातील सर्वात श्रीमंत लीग असलेल्या आयपीएलचे दरवाजे उघडले आहेत.
सनरायझर्स हैदराबादच्या ट्रायल्स वेळी ओमकारने स्नायू दुखापतीमुळे फक्त दोन षटके गोलंदाजी केली. पण या १२ चेंडूत त्याने SRH संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक वरुण अरॉनला आपल्या वेगाने प्रभावित केले. हीच गोष्ट ठाणेकराच्या आयुष्याला टर्निंग पाइंट देणारी ठरली आहे.
कोणत्याही क्रिकेटरच्या यशात फक्त त्याची एकट्याची मेहनत नसते, तर त्याच्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्यही दावणीला लावलेले असते. ओमकारला क्रिकेटरच्या रुपात घडवण्यात त्याच्या आई वडिलांचा मोलाचा वाटा आहे.
लेकाची IPL मध्ये निवड झाल्यावर ओमकारचे वडील तुकाराम तरमळे यांचा आनंद गगनात मावेना असाच होता. घरची परिस्थिती अगदी बेताची असताना ओमकारच्या वडिलांनी पोराच्या क्रिकेट कारकिर्दीत अडथळा येऊन नये, म्हणून कर्जही काढलं. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर लेकानं IPL मधील निवडीसह आई वडिलांचे पांग फेडले आहेत.
सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून IPL मध्ये एन्ट्री मारल्यावर टी. नटराजन, उमरान मलिक या जलदगती गोलंदाजांना भारतीय संघात संधी मिळाली आहे. ओमकारलाही आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाचे दरवाजे ठोठावण्याची चांगली संधी आयपीएल २०२६ च्या हंगामात असेल.