ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला डावाच्या फरकानं पराभूत केलं. डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद त्रिशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं कुटलेल्या 589 धावांचा पाकिस्तानला दोन्ही डावांत पाठलाग करता आला नाही. डे नाइट कसोटीत ऑसी गोलंदाजांनी पाकच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फार काळ टिकूच दिले नाही.  या पराभवासह पाकिस्ताननं लाजीरवाणा विक्रम नावावर नोंदवला. त्यांनी बांगलादेशलाही मागे टाकताना नकोशी नामुष्की ओढावून घेतली. 


दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं पहिला 3 बाद 589 धावांवर डाव घोषित केला आणि त्याचा पाठलाग करणारा पाकिस्तानचा पहिला डाव 302 धावांत गडगडला. ऑसींच्या खेळीत वॉर्नरचे त्रिशतक महत्त्वाचे ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरनं प्रथमच त्रिशतक झळकावले. त्यानं पाक गोलंदाजांची धुलाई करून नाबाद 335 धावा कुटल्या. त्यानं 418 चेंडूंत 39 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 335 धावांची विक्रमी खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.  


दुसऱ्या डावातही पाकिस्तानची घसरण सुरूच राहिली. नॅथन लियॉनने पाकचा निम्मा संघ माघारी पाठवला. पाकिस्तानला दुसऱ्या डावात 239 धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना एक डाव व 48 धावांनी पराभव पत्करावा लागला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कनं 6, तर पॅट कमिन्सनं तीन विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानचा दुसऱ्या डावात ऑसींच्या नॅथन लियॉननं पाच, तर जोश हेझलवूडनं तीन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात शान मसूद ( 68) आणि असद शफीक ( 57) यांनी संघर्ष केला. पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियातील हा सलग 14वा कसोटी पराभव आहे आणि एका देशात सलग सर्वाधिक कसोटी सामने हरणाऱ्या संघात पाकिस्तान अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्यांनी बांगलादेशचा सलग 13 कसोटी पराभवाचा विक्रम मोडला. 

 

पाकिस्तानची ऑस्ट्रेलियातील कामगिरी ( 1999 पासून-)
1999 - ऑस्ट्रेलिया विजयी 3-0
2004 - ऑस्ट्रेलिया विजयी 3-0
2009 - ऑस्ट्रेलिया विजयी 3-0
2016 -  ऑस्ट्रेलिया विजयी 3-0
2019 - ऑस्ट्रेलिया विजयी 2-0


एका देशात सलग सर्वाधिक पराभूत होणारे संघ
14* - पाकिस्तान ( ऑस्ट्रेलिया दौरा 1999 ते आतापर्यंत)
13- बांगलादेश ( बांगलादेशातच 2001 ते 2004) 

ऑस्ट्रेलियात सलग सर्वाधिक पराभूत संघ
14* - पाकिस्तान ( 1999 ते 2019) 
9 -  भारत ( 1948-1977)
9 - वेस्ट इंडिज ( 2000-2009)
8 - दक्षिण आफ्रिका ( 1911 - 1952)
8 - इंग्लंड ( 1920 ते 1925 आणि 2013 ते 2017) 
 

Web Title: Pakistan creat world record for the most 14th consecutive losses in one country in Test history 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.