Zimbabwe beat Australia, AUS vs ZIM Match Highlight Video: टी२० विश्वचषक स्पर्धेच्या ब गटात झिम्बाब्वेच्या संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव केला. २००७च्या टी२० विश्वचषक स्पर्धेतही झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनी झिम्बाब्वेच्या संघाने अशक्यप्राय वाटणाऱ्या इतिहासाची पुनरावृत्ती करून दाखवली. सलामीवीर ब्रायन बेनेटच्या नाबाद ६४ धावांच्या जोरावर झिम्बाब्वेने २० षटकात १६९ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मॅट रेनशॉच्या अर्धशतकी (६५) खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला केवळ १४६ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत २ गुण कमावले.
ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य फलंदाजीसाठी सोपे वाढणारे १७० धावांचे आव्हान झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी अवघड केले. सलामीवीर जॉश इंग्लिस (८) स्वस्तात बाद झाला. पाठोपाठ कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिड शून्यावर माघारी परतले. दुसरा सलामीवीर ट्रेव्हिस हेडदेखील १७ धावांवर बोल्ड झाला. मॅट रेनशॉने झुंजार अर्धशतकी खेळी केली. त्याने ४४ चेंडूत ६५ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलही ३१ धावांवर बाद झाला. दुखापतग्रस्त मार्कस स्टॉयनीस (६), बेन ड्वारशूएस यांना फारशी चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळे त्यांचा २३ धावांनी पराभव झाला. ब्लेसिंग मुजाराबानीने सर्वाधिक ४, ब्रॅड इव्हान्सने ३, विलिंगटन आणि रायन यांनी १-१ बळी मिळवला.
AUS vs ZIM Match Highlight Video:
प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या संघाने २० षटकांत दमदार फलंदाजी २ बळी गमावून १६९ धावा केल्या. सलामीवीर मारूमानी २१ चेंडूत ३५ धावांवर बाद झाला. तर रायन बर्लने ३० चेंडूत ३५ धावा केल्या. दुसरा सलामीवीर ब्रायन बेनेट शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ५६ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ६४ धावा केल्या. तर दुसरीकडे कर्णधार सिकंदर रझा याने १३ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद २५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरुन ग्रीन आणि मार्कस स्टॉयनीस या दोघांनी १-१ बळी घेतला.