Yuzvendra Chahal Punjab Kings Bus Driver, Shashank Singh IPL 2025: स्पर्धेमध्ये पंजाब किंग्जने शानदार कामगिरी करत प्ले-ऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सने पराभव करून पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहेच. त्यासोबत क्वालिफायर १ मध्ये आपले स्थानही पक्के केले. तब्बल ११ वर्षांनी पंजाब किंग्ज संघ प्लेऑफ फेरी खेळणार आहे. त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यानंतर संघाचा फलंदाज शशांक सिंगने पत्रकार परिषदेत संघाचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्याने युजवेंद्र चहल आणि पंजाब किंग्ज संघाचे बस ड्रायव्हर या दोघांबद्दल केलेले विधान चांगलेच व्हायरल झाले आहे.
शशांक सिंगचे विधान व्हायरल
शशांक सिंगने खुलासा केला की संघातील सर्वांना समान आदर दिला जातो. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असो किंवा सपोर्ट स्टाफचा सदस्य असो सगळ्यांनाच आदर दिला जातो. उदाहरण देताना तो म्हणाला की, प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केले होते की संघाचा वरिष्ठ खेळाडू युजवेंद्र चहल आणि संघाचा बस ड्रायव्हर यांना समान सन्मान मिळेल. शशांकच्या मते, समानतेची ही भावना संघाच्या यशाचे एक प्रमुख कारण आहे.
नेमकं काय म्हणाला शशांक सिंग?
शशांक म्हणाला, "पहिल्या दिवसापासूनच रिकी आणि श्रेयस दोघांनीही आम्हाला सांगितले होते की ते दोघेही संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू युजवेंद्र चहल आणि आमच्या बस ड्रायव्हरला समान आदर देतील. ते स्वत: या मूल्याचं पालन करतात. यामुळेच संघातील वातावरणाबद्दल बरेच काही सकारात्मक घडते. मी आतापर्यंत खेळलेल्या सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी रिकी पॉन्टींग एक आहे. पॉन्टिंगने संघाची संस्कृती बदलली आहे. त्याने आमची मानसिकता बदलली आहे. याचे सर्व श्रेय त्यालाच जाते."
पंजाब किंग्जचे पहिले जेतेपदावर लक्ष
पंजाब किंग्ज पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग आहे. पण त्याने एकदाही विजेतेपद जिंकलेले नाही. यावेळी पंजाब किंग्ज खूप चांगल्या लयीत दिसत आहेत. या हंगामात, पंजाब किंग्जने १४ सामन्यांत ९ विजयांसह १९ गुण मिळवले आहेत आणि टॉप-२ मध्ये स्थान मिळवले आहे. क्वालिफायर १ मध्ये, त्यांचा सामना आरसीबी किंवा गुजरात टायटन्सशी होईल.