The Cricket fraternity reacts on Virat Kohli's decision : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीनं ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्वपद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर बीसीसीआयनं वन डे संघाच्या कर्णधारपदावरून त्याची हकालपट्टी केली आणि आज त्यानं कसोटी संघाचेही नेतृत्व सोडले. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं प्रथमच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला. कसोटी क्रिकेटमधील भारताचा हा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वाधिक ४० ( ६८ सामन्यांपैकी) कसोटी सामने जिंकले. विराट कोहलीच्या या निर्णयानं क्रिकेटविश्वाला धक्का बसला, परंतु साऱ्यांनी त्याचे कौतुक केले.
''माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. विराटच्या निर्णयाचा मी आदर करतो. जागतिक आणि भारतीय क्रिकेटसाठी त्यानं जे केलं त्यासाठी मी त्याचे केवळ कौतुक करू शकतो. सर्वात आक्रमक आणि तंदुरुस्त खेळाडू भारताला मिळाला. खेळाडू म्हणून तो शाईन करत राहील, अशी आशा आहे,''असे ट्विट सुरेश रैनानं केलं.
'' भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीनं मिळवलेल्या यशाचे खूपखूप अभिनंदन.. आकडे खोटं बोलत नाहीत आणि तू फक्त भारताचाच नव्हेत तर जगातील सर्वोत्तम कसोटी संघाच्या कर्णधारांपैकी एक आहेस. तुझा सार्थ अभिमान आहे,''असे वीरेंद्र सेहवाग म्हणाला.
''हा खूप अविश्वसनीय प्रवास होता. तू जे यश मिळवलं आहेस, ते फार कमी लोकांना मिळवता आले आहे. स्वतःला झोकून देत आणि प्रत्येकवेळी खरा चॅम्पियन म्हणून तू खेळलास,''असे युवीनं ट्विट केलं.