Join us

टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची गरज काय, भज्जीच्या ट्विटवर युवीचं भन्नाट उत्तर

भारतीय संघाला अजूनही चौथ्या क्रमांकासाठी सक्षम पर्याय सापडलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 12:03 IST

Open in App

भारतीय संघाला अजूनही चौथ्या क्रमांकासाठी सक्षम पर्याय सापडलेला नाही. इंग्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या दोन वर्ष आधीपासून ते स्पर्धेनंतरही हा प्रश्न कायम आहे. या स्थानासाठी भारताचा महान फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनं मुंबईच्या सूर्यकुमार यादवचे नाव सुचवले. पण, माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने त्या ट्विटवरून भज्जीची फिरकी घेतली.

मुंबईच्या या खेळाडूला मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. शिवाय विजय हजारे चषक स्पर्धेत त्याने छत्तीसगडविरुद्ध 31 चेंडूंत 81 धावांची वादळी खेळी केली होती. मात्र, मुंबईला पराभव पत्करावा लागला. त्याच्या या खेळीनं हरभजन सिंगचे मन जिंकले. 

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 5 बाद 317 धावा केल्या. जय बिस्ता ( 24) झटपट माघारी परतल्यानंतर आदित्य तरे आणि यशस्वी जैस्वाल यांनी 90 धावांची भागीदारी केली. तरेने 107 चेंडूंत पाच चौकार व 2 षटकार खेचून 90 धावा केल्या. जैस्वालने 62 चेंडूंत 3 चौकारांसह 44 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने 46 चेंडूंत 50 धावांची खेळी केली. त्यात 4 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. पण, सूर्यकुमार यादवने दिवस गाजवला. त्याने 31 चेंडूंत 8 चौकार व 6 षटकारांसह 81 धावांची वादळी खेळी करताना मुंबईला 317 धावांचा पल्ला गाठून दिला. शिवम दुबेने 12 चेंडूंत नाबाद 16 धावा केल्या.

प्रत्युत्तरात छत्तीसगडच्या आघाडीच्या फलंदाजाना मोठी खेळी करता आली नाही. जिवनज्योत सिंग ( 44), आशुतोष सिंग ( 35) आणि कर्णधार हरप्रीत सिंग ( 26) यांनी हातभार लावला. पण, खरेने मुंबईच्या तोंडचा घास पळवला. त्यानं 94 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 117 धावा केल्या. त्याला शशांक सिंग ( 40) आणि अजय मंडल ( 39*) यांनी तुल्यबळ साथ दिली. हरभजन म्हणाला,''स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यानं धावा करूनही सूर्यकुमारला टीम इंडियात संधी का दिली जात नाही, हे समजत नाही. तो खूप मेहनत घेत आहे. तुझी वेळ येईल.''   हरभजनच्या या ट्विटवर युवीनं मजेशीर उत्तर दिले. त्यानं लिहिले की,''मी तुला सांगितले ना यार.. टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची गरज नाही. आपले आघाडीचे फलंदाज तगडे आहेत.'' 

 

टॅग्स :युवराज सिंगहरभजन सिंगमुंबई इंडियन्स