Rohit Sharma Angry Viral Video: टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा मैदानावर शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र, नुकत्याच घडलेल्या एका घटनेने रोहितला संताप अनावर झाला. रोहित आपल्या कारमध्ये बसलेला असताना काही तरुण चाहत्यांनी रोहितशी गैरवर्तन केले. त्यावेळी रोहितने त्यांना जाब विचारत कडक शब्दांत तंबी दिली.
नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा आपल्या कुटुंबासह कारने जात असताना काही तरुण चाहत्यांनी सेल्फी आणि स्वाक्षरीसाठी त्याच्या कारचा पाठलाग केला. रोहितने सुरुवातीला खिडकीतून हात बाहेर काढून चाहत्यांना प्रतिसाद दिला आणि एकाशी हस्तांदोलनही केले. मात्र, त्यानंतर दोन तरुणांनी अतिउत्साहात रोहितचा हात चक्क कारबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. चालत्या गाडीत घडलेली ही कृती केवळ रोहितसाठीच नाही, तर त्या मुलांसाठीही अत्यंत धोकादायक होती.
रोहितची संतप्त प्रतिक्रिया
चाहत्यांच्या या वागणुकीमुळे रोहित शर्मा प्रचंड नाराज झाला. त्याने तात्काळ आपला हात आत ओढून घेतला आणि कारची काच वर करण्यापूर्वी त्या तरुणांना कडक शब्दांत सुनावले. अशा प्रकारची 'वेडेपणा' खपवून घेतला जाणार नाही, असे त्याच्या हावभावावरून स्पष्टपणे जाणवत होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर रोहित शर्माच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रोहित शर्मा नुकताच विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी खेळताना दिसला होता, जिथे त्याने सिक्कीमविरुद्ध १५५ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. आता तो ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात सामील होणार आहे. मात्र, मैदानात उतरण्यापूर्वीच चाहत्यांच्या या विचित्र वागणुकीमुळे रोहित सध्या चर्चेत आला आहे.