नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून नकारात्मक गोष्टी विराट कोहलीच्या अवतीभवती फिरत असताना भारताचा माजी स्टार खेळाडू युवराज सिंगने विराटसाठी भावनिक पत्र लिहिले आहे. यासोबत त्याने स्पेशल गिफ्टही पाठवले. पत्रात युवराज लिहितो, ‘विराट, मी तुला एक क्रिकेटर आणि एक व्यक्ती म्हणून वाढताना पाहिले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या नेटमधील त्या तरुण मुलापासून ते आता तू स्वत: एक दिग्गज बनला आहेस आणि नवीन पिढीला मार्ग दाखवत आहेस.'
'तुझी शिस्त आणि मैदानावरील महत्त्वाकांक्षा आणि खेळाप्रति असलेले समर्पण या देशातील प्रत्येक तरुण मुलाला बॅट उचलण्याची आणि एक दिवस निळी जर्सी घालण्याचे स्वप्न पाहण्यास प्रेरित करते. तू प्रत्येक वर्षी तुझा क्रिकेटचा स्तर उंचावला आहेस आणि आधीच इतके काही साध्य केले आहेस की, तुझ्या कारकिर्दीतील नवीन अध्याय सुरू करताना पाहून मला आणखी आनंद होतो. तू एक महान कर्णधार आणि उत्कृष्ट लीडर आहेस.'
'मी तुझ्याकडून आणखी अनेक विक्रमांची अपेक्षा करतो आहे. एक सहकारी आणि त्याहूनही अधिक मित्र म्हणून तुझ्यासोबत एक नाते जुळले आहे आणि त्याचा मला आनंद आहे. धावा करणे, लोकांची फिरकी घेणे, जेवताना टिंगळटवाळी करणे, पंजाबी गाण्यांवर नाचणे आणि चषक जिंकणे, हे सर्व तुझ्यासोबत मी केले आहे. माझ्यासाठी तू नेहमीच चीकू राहशील आणि जगासाठी किंग कोहली. तुझ्यातील आग नेहमी तेवत ठेव. तू सुपरस्टार आहेस. तुझ्यासाठी हा खास गोल्डन बूट. देशाला तुझा अभिमान आहे.’