कोलकाता नाईट रायडर्सने रविवारी चेन्नईत इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ चे जेतेपद पटकावले. २०१२ मध्ये चेन्नईच्याच मैदानावर KKR ने पहिले आयपीएल जेतेपद जिंकले होते आणि त्यानंतर बरोबर १२ वर्षांनी चेपॉकवर त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी उचलली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आणखी एक वर्ष जेतेपदापासून दूर रहावे लागले. RCB च्या विराट कोहलीने ऑरेंज कॅप जिंकली, तर पंजाब किंग्सच्या हर्षल पटेलने पर्पल कॅप जिंकली. विराटने या पर्वात १५ सामन्यांत ६१.७५च्या सरासरीने सर्वाधिक ७४१ धावा केल्या. पण, चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) याने विराटवर जोरदार टीका केली. त्याच्यासोबत असलेल्या केव्हीन पीटरसन व मॅथ्यू हेडन यांनी लाईव्ह कार्यक्रमात मग रायुडूला जोकर म्हटले.
KKR च्या विजेतेपदानंतर स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात केव्हीन पीटरसन, मॅथ्यू हेडन व अंबाती रायुडू यांनी सहभाग घेतला होता. यावेळी परदेशी खेळाडू भारताच्या माजी खेळाडूची फिरकी घेताना दिसली. प्रेझेंटर मयांती लँगरने जेव्हा रायुडूने सामन्याच्या आधी भगवे जॅकेट घातल्याचे निदर्शनास आणून दिले, परंतु KKR ने विजय मिळवल्यानंतर त्याने जांभळ्या रंगाचे जॅकेट घातले. यावरून पीटरसन व हेडन यांनी रायुडूची फिरकी घेतली. पीटरसनने तर त्याला ऑन एअऱ जोकर म्हटले.
पीटरसन व हेडन यांच्या फिरकीनंतर रायुडू हतबल झालेला दिसला आणि त्यानंतर त्याने विराट कोहलीच्या ऑरेंज कॅपचा मुद्दा छेडला. ऑरेंज कॅप जिंकणे म्हणजे आयपीएल जिंकणे असे होत नाही, असे रायुडू म्हणाला. त्याने पुढे म्हटले की,'ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश यांच्यासोबत काम करण्यास भारतीय योग्य नाहीत, ते दादागिरी करतात.'