Yashasvi Jaiswal ची ऐतिहासिक कामगिरी; सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गजांच्या पंक्तित पटकावले स्थान
Yashasvi Jaiswal ची ऐतिहासिक कामगिरी; सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गजांच्या पंक्तित पटकावले स्थान
Yashasvi Jaiswal, Ranji Trophy 2022 : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर उत्तर प्रदेशला बॅकफूटवर फेकले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:07 IST
Yashasvi Jaiswal ची ऐतिहासिक कामगिरी; सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गजांच्या पंक्तित पटकावले स्थान
Yashasvi Jaiswal, Ranji Trophy 2022 : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर उत्तर प्रदेशला बॅकफूटवर फेकले आहे. पहिल्या डावातील २१३ धावांच्या आघाडीत मुंबईने चौथ्या दिवसात दुपारपर्यंत ३९७ धावांची भर घातली आहे. मुंबईच्या दुसऱ्या डावात कर्णधार पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने विक्रमी कामगिरी केल्यानंतर यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) चौथ्या दिवशी ऐतिहासिक पराक्रम केला. ५४ चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव घेणाऱ्या यशस्वीने चौथ्या दिवशी १५०+ धावा केल्या आहेत. त्याची ही कामगिरी त्याला एसएम कादरी, दत्तू फडकर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आदी दिग्गजांच्या पंक्तित नेऊन बसवणारी ठरली.
हार्दिक तामोरे ( ११५) व यशस्वी ( १००) यांच्या शतकाच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ३९३ धावा केल्या. शाम्स मुलानी ( ५०), सर्फराज खान ( ४०), सुवेध पारकर ( ३२) व तनुष कोटियन ( २२) यांनी धावसंख्येत हातभार लावला. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशच्या फलंदाजांना अपयश आले. तुषार देशपांडे, मोहित अवस्थी व कोटियन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेताना उत्तर प्रदेशला १८० धावांत गुंडाळले. दुसऱ्या डावात मुंबईसाठी कर्णधार पृथ्वीने दमदार सुरुवात केली. त्याने ७१ चेंडूंत १२ चौकारांसह ६४ धावा केल्या. मुंबईच्या फलकावर ६६ धावांपैकी ६४ धावा या पृथ्वीच्या होत्या. नॉन स्ट्राईकला असलेल्या यशस्वीने ५४ चेंडूंनंतर पहिली धाव घेतली अन् टाळ्यांचा कडकडाट झाला.
मुंबईने दिवसअखेर १ बाद १३३ धावा केल्या आहेत. यशस्वी ११४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३५ धावांवर, तर अरमान जाफर ६७ चेंडूंत ५ चौकारांसह ३२ धावांवर खेळत होता. यशस्वी व अरमान यांनी चौथ्या दिवशी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी २८६ धावांची भागीदारी केली. अरमान २५९ चेंडूंत १५ चौकार व २ षटकारांसह १२७ धावांवर बाद झाला. यशस्वीनेही शतक झळकावले. त्याने पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती आणि मुंबईकडून रणजी करंडकात दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो ९ वा फलंदाज ठरला आहे. यशस्वी १७५ धावांवर खेळतोय आणि मुंबईची आघाडी ६१३ धावांपर्यंत पोहोचली आहे.