रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा वेगवान गोलंदाज यश दयालविरुद्ध आणखी एका मुलीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आयपीएल २०२५ दरम्यान दयालने पीडित मुलीला क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यास मदत करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जयपूरच्या सांगानेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. क्रिकेट खेळताना पीडिताची यशशी ओळख झाली. त्यावेळी यशने तिला क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यात मदत करण्याचे अश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आयपीएल २०२५ दरम्यान यशने तिला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. पंरतु, मानसिक आणि शारीरिक त्रास वाढल्याने पीडिताने पोलिसांत यश विरोधात तक्रार दिली. पीडिताचा जबाब नोंदवून पोलिसांनी यशविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणात तो दोषी आढळल्यास त्याला किमान १० वर्षांचा शिक्षा होऊ शकते, जी जन्मठेपेपर्यंत वाढू शकते.
यश दयाल याच्याविरुद्ध जुलैमध्ये एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली गाझियाबादमधील इंदिरापुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून यशने पीडिते महिलेचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केले, असा त्याच्यावर आरोप करण्यात आला.