Cricketer Yash Dayal Police Case : भारतीय क्रिकेटपटू यश दयाल मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे. IPC चा हे कलम अजामीनपात्र असून या कलमाअंतर्गत यश दयालला १० वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते. पोलिस सूत्रांनी सांगितले की, पीडित मुलीने यश दयालवर लग्नाचे आमिष दाखवून तिचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने पोलिसांना असेही सांगितले की, यश दयालने लग्नाच्या नावाखाली तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने तिच्या आरोपांबाबत व्हॉट्सअप चॅट्स, व्हिडिओ कॉल्स आणि फोटोंचे स्क्रीनशॉट असे पुरावे देखील सादर केले आहेत. त्याआधारावर पोलीस तपास करत आहेत.
यश दयालला तुरुंगवास होऊ शकतो...
यश दयालविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पीडित मुलीने प्रथम १४ जून रोजी महिला हेल्पलाइन क्रमांक १८१ वर फोन केला होता. परंतु तेथे कोणतीही सुनावणी न झाल्याने तिने २१ जून रोजी मुख्यमंत्री हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार केली. पीडितेने यश दयालवर लावलेल्या आरोपांची चौकशी पोलिसांनी आता सुरू केली आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर आणि तिचा जबाब कायदेशीररित्या दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवल्यानंतरच पोलिस कारवाई सुरू होईल. पोलिस कारवाईचा भाग म्हणून यश दयालला अटक देखील केली जाऊ शकते. जर यश दयालवर लावलेले आरोप तपासात सिद्ध झाले आणि तो दोषी आढळला तर त्याला १० वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.
पीडितेच्या आरोपांमध्ये कुठल्या गोष्टींचा उल्लेख?
पीडित मुलगी गाझियाबादमधील इंदिरापुरम येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. यश दयालविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल करताना तिने सांगितले की, ती गेल्या ५ वर्षांपासून क्रिकेटपटूसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने असाही दावा केला आहे की यश दयालच्या कुटुंबाने तिला लग्नाचे आश्वासन दिले आहे. ती वारंवार यश दयालच्या घरी येत असे. तथापि, आतापर्यंत यश दयाल किंवा त्याच्या कुटुंबाने या प्रकरणात कोणतेही विधान केलेले नाही. सोशल मीडियावरही कोणतीही प्रतिक्रिया दिसलेली नाही.