ठळक मुद्देइंडियन प्रिमिअल लीग (IPL) २०१३ स्पॉट फिक्सिंगमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. BCCI नं तीन खेळाडूंवर घातली होती आजीवन बंदी.
इंडियन प्रिमिअर लीग (IPL) २०१३ स्पॉट फिक्सिंगमुळे चर्चेत राहिलं होतं. बीसीसीआयनं (BCCI) यानंतर तीन खेळाडूंवर कडक कारवाई करत त्यांच्यावर आजीवन खेळण्यास बंदी घातली होती. यामध्ये एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या खेळाडूंचा समावेश होता. यापूर्वी एस. श्रीसंतची शिक्षा कमी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा तो मैदानावार दिसला होता.
याचरम्यान अंकित चव्हाण यानं लोकपाल डी.के.जैन यांनी आपली शिक्षा कमी करून ती सात वर्षे केल्याचा दावा अंकित चव्हाणनं केला आहे. परंतु बीसीसीआयकडून त्याला यासंदर्भात अद्याप अधिकृत पत्र मिळालेलं नाही. अंकित चव्हाण यानं 'क्रिकबझ'शी बोलताना याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोशिएशनला मदत करण्यास सांगितलं आहे. लोकपाल जैन यांनी एका महिन्यापूर्वी ३ मे रोजी हा निर्णय दिला आहे. अशा परिस्थितीत आपल्यावरील बंदी सप्टेंबर २०२० मध्ये संपली असल्याचंही त्यानं म्हटलं.
"मी लोकपाल यांच्या आदेशासह बीसीसीआयला पत्रही लिहिलं होतं. परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणतंही उत्तर आलेलं नाही. मी एमसीएकडे मदत मागितली आहे, जेणेकरून मी पुनरागमन करू शकेन," असंही अंकित चव्हाण म्हणाला. बीसीसीआयनं एस. श्रीसंतवरही आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती. २००७ आणि २०११ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा श्रीसंत एक भागही होता.