Join us

WTC जिंकायची, पण दडपण येऊ देणार नाही! मागे काय घडले, याचा विचार करीत नाही: रोहित शर्मा 

आयसीसी स्पर्धा न जिंकण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा रोहित शर्मा संतापला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 08:12 IST

Open in App

- अभिजित देशमुख, लंडन : कर्णधारपद सोडण्याआधी मला एक किंवा दोन मोठी जेतेपदे मिळवायची आहेत. त्यासाठीच आपण खेळत असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसी फायनल आणि आयसीसी चॅम्पियनशिप जिंकण्यासाठीच येथे आलो आहे, असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने मंगळवारी स्पष्ट केले. ओव्हलवर बुधवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याआधी माध्यमांशी संवाद साधताना रोहितने अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.

कर्णधार म्हणून कोणता वारसा सोडशील, असे विचारताच रोहित म्हणाला, ‘मी असो, वा अन्य कुणी. आम्ही सर्वजण खेळाडू आणि कर्णधार म्हणून अधिकाधिक सामने आणि स्पर्धा जिंकू इच्छितो. तथापि, या गोष्टींचा वारंवार विचार करून स्वत:वर दडपण येऊ देणार नाही. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. माझ्या नेतृत्वाखाली एक-दोन आयसीसी स्पर्धा जिंकायला नक्कीच आवडेल.’ सकाळी आकाश ढगांनी वेढले असताना रोहित, अश्विन, उमेश यादव आणि के. एस. भरत सरावासाठी आले होते.

...अन् रोहित संतापला

- आयसीसी स्पर्धा न जिंकण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा रोहित शर्मा संतापला. तो म्हणाला की, टीम इंडिया मागील आयसीसी स्पर्धांमध्ये काय घडले, याचा विचार करीत नाही.  आयसीसीच्या स्पर्धांची वारंवार आठवण करून दिली नाही तर बरे होईल.’

- टीम इंडियाने गेल्या दहा वर्षांपासून आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. २०१४  च्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. २०१५ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाला होता. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. २०१९ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील भारताचा प्रवास संपुष्टात आला.

- २०२१ च्या टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीत टीम इंडिया बाहेर गेला. २०२१ मध्येच टीम इंडियाला डब्ल्यूटीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०२२ च्या  टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही भारताचा पराभव झाला.

 

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App